पाणी मागण्याच्या बहाण्याने पतीचा खून, पत्नी गंभीर ; केज तालुक्यातील घटना.

केज दि.12 जुलै – पाणी मागण्याच्या बहाण्याने पतीचा खून करत पत्नीला गंभीर जखमी केल्याची घटना केज तालुक्यातील चिंचोली माळी येथे घडली. सदर घटना सोमवार दि.11 जुलै रोजी रात्री सव्वा सातच्या सुमारास घडली असून या घटनेमुळे केज तालुक्यात खळबळ उडाली आहे.
केज तालुक्यातील चिंचोली माळी येथे पांडुरंग राऊत यांचे रस्त्यावर घर आहे. राऊत यांच्या घरी दि.11 जुलै सोमवार रोजी सायंकाळी सुमारे सव्वासात वाजण्याच्या सुमारास तोंडाला स्कार्फ बांधलेले तीन अनोळखी व्यक्ती आले. त्यांनी यावेळी पिण्यासाठी पाणी मागितले. पांडुरंग राऊत यांच्या पत्नी शशिकला राऊत या पाणी घेऊन येताच त्या तीन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील दागिने हिसकावून घेतले. या वेळी शशिकला यांचे पती पांडुरंग राऊत यांनी विरोध केला असता त्या अज्ञाताने त्यांच्यावर चाकूने वार करून त्यांस गंभीर जखमी केले.
या हल्ल्यात पांडुरंग राऊत (वय 60 वर्ष ) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर चोरट्या सोबत झालेल्या झटापटीत त्यांची पत्नी शशिकला राऊत ही गंभीर जखमी झाली आहे. मारेकऱ्यांनी खून करून पळून जाताना कोणाला दिसू नये आणि ओळख पटू नये म्हणून घरातील विजेचा बल्ब काढून अंधार केला. घटना घडल्यानंतर जखमी अवस्थेत दोघांना तात्काळ केज येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र तत्पुर्वीच पांडूरंग राऊत यांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले.
जखमी शशिकला राऊत यांच्यावर उपचार सुरु आहेत. या खूनाच्या (Murder) घटनेची माहिती मिळताच केज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक (Police Inspector) शंकर वाघमोडे, पोलिस उपनिरिक्षक (PSI) वैभव सारंग, पो.ना. राजू गुंजाळ यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेने परिसरात खळबळ माजली असून पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांचा तपास घेण्यासाठी नाकाबंदी केली. सदर हल्ला कोणत्या कारणाने झाला हे मात्र स्पष्ट झाले नाही.
( Husband’s murder under the pretext of asking for water, wife serious; Incidents in Kaij taluka. )