सलून व ब्युटी पार्लर संघटनांचा ‘ब्रेक द चेन’ मोहिमेस कडाडून विरोध.

मुंबई दि.5 एप्रिल – राज्यातील सलून आणि ब्युटी पार्लर 30 एप्रिलपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’ (Break the Chain) मोहिमेत रविवारी घेतला. मात्र या निर्णयाला राज्यातील सलून व ब्युटी पार्लर संघटनांनी कडाडून विरोध केला आहे. इतर दुकाने आठवड्यातील पाच दिवस सुरू असताना फक्त सलून आणि ब्युटी पार्लर (Salon and beauty parlor) बंद का ठेवायचा? असा उलट सवाल सलून व ब्युटी पार्लर संघटनांनी उपस्थित केला आहे. या निर्णयाचा जाहीर निषेध व्यक्त करत राज्यात नाभिक समाजामधून आत्महत्यांचे सत्र पुन्हा सुरू होण्याची भीती महाराष्ट्र (Maharashtra) नाभिक महामंडळाने व्यक्त केली आहे.
(Strong opposition from salon and beauty parlor associations to the ‘Break the Chain’ campaign.)
महाराष्ट्र (Maharashtra) नाभिक महामंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय अनारसे यांनी सांगितले की, गेल्या वर्षी झालेल्या लॉकडाऊनमुळे (lockdown) शहरी आणि ग्रामीण भागात तब्बल 17 नाभिक बांधवांनी आत्महत्या केल्या होत्या. त्या आत्महत्याग्रस्त कुटुंबांना शासनाने अद्याप कुठलीही मदत केलेली नाही. जुनी देणी भागवण्याचे काम सुरू असताना शासनाने पूर्ण व्यवसाय बंद करण्यास सांगितल्याने मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढणार आहे. याआधीच दागिने विकून पुन्हा व्यवसाय सुरू करण्यात आला होता. मात्र आत्ता तर तेही शक्य नाही. त्यामुळे शासनाने त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करावा. कारण या निर्णयामुळे नाभिक समाज आगीतून फुफाट्यात होरपळणार असल्याचे अनारसे यांचे म्हणनं आहे.
मुंबई सलून आणि ब्युटी पार्लर असोसिएशचे अध्यक्ष दीपक यादव यांनी शासनाच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला आहे. यादव यांनी सांगितले की, मिशन बिगीन अगेनमध्ये आखून दिलेल्या सर्व निर्बंधांचे पालन करत सलूनचालक उदरनिर्वाह चालवत होते. गर्दी होईल अशा दुकानांना परवानगी देत शासनाने गर्दी टाळणार्या सलून व ब्युटी पार्लरवर बंदीची कुर्हाड चालवली आहे. सलून व्यवसायिक व कारागीर यांना हा लॉकडाऊन (lockdown) आर्थिकदृष्ट्या सहन होणार नाही. दुकान सुरू करण्यासाठी घेतलेल्या कर्जाचे हफ्ते अजून थकलेले आहेत. त्यात गेल्या चार महिन्यांत थकलेले दुकानाचे भाडे व लाईट बिल भरण्याचा प्रयत्न कारागीर करत होते. मात्र आता शासनाने पुन्हा सलूनचालकांना आर्थिक संकटात टाकले आहे.
सरकारने घेतलेला निर्णय मान्य करताच येणार नाही. मुळात याआधी घालून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करून सलून व ब्युटी पार्लर चालक व्यवसाय करत आहेत. त्यात डिस्पोजल अप्रॉन, सॅनिटायझेशन, मास्क यांचा वापरही सुरू आहे. व्यवसाय खर्चिक झाला असला, तरी पोटाला चिमटा काढून रोजगार टिकवण्याचे काम सुरू आहे. तरीही इतर दुकानांप्रमाणे शनिवार व रविवारी पूर्णपणे सलून व ब्युटी पार्लर (Salon and beauty parlor) बंद ठेवण्याचा निर्णय व्यवसायिकांनी मान्य केला असता. मात्र सरसकट 30 एप्रिलपर्यंत सलून बंद ठेवणे याघडीला अशक्य आहे. त्यामुळे या निर्णयाविरोधात लवकरच राज्यातील सलून व ब्युटी पार्लर चालक व कारागीर यांची बैठक पार पडेल. तसेच सर्वानुमते निर्णय घेऊन पुढील दिशा ठरवली जाईल असे महाराष्ट्र सलून व ब्युटी पार्लर असोसिएशनचे सल्लागार उदय टक्के यांनी सांगितले आहे.