धारुर शहरात तरुणांनी राबवला राष्ट्रीय ऐक्याचा उपक्रम.

किल्ले धारूर दि.3 मे – आज संपुर्ण देशभर एकीकडे ईद उल फित्र व अक्षय तृतीयेचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या दुग्धशर्करा योगात समस्त हिंदू मुस्लिम समुदाय आनंदोत्सव साजरा करत असताना धारुर (Dharur) शहरात राष्ट्रीय ऐक्याचा अनोखा उपक्रम दोन्ही समाजातील तरुण वर्ग राबवत असल्याचे चित्र दिसून आले.
दि.2 एप्रिल रोजी गुढी पाडवा (Gudi Padawa) साजरा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे दि.3 एप्रिल पासून सर्वत्र पवित्र रमजान (Ramadan) मासांरभ होवून रमजानची धुम दिसून आली. नेमके याच काळात संपुर्ण महाराष्ट्रात मशिदीवरील भोंग्याचे राजकारण तापवण्यात आले. दोन समाजात दुही निर्माण करण्याच्या या प्रयत्नातच अनेक ठिकाणी मात्र हिंदू मुस्लिम ऐक्य अबाधित ठेवण्यासाठी तरुणाई सरसावल्याचे दिसून आले.
धारुर शहरातील प्रभाग एकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रदिप नेहरकर यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhanajay Munde) व आमदार प्रकाशदादा सोळंके (Prakash Solanke) यांच्या प्रेरणेने जि.प. सभापती जयसिंग सोळंके (Jaysing Solanke) यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी नगराध्यक्ष माधव निर्मळ, राष्ट्रवादीचे (NCP) जिल्हा सरचिटणीस सय्यद शाकेरअली, शहराध्यक्ष नितिन शिनगारे यांच्या हस्ते गोरगरीब मुस्लिम बांधवासाठी ईदपर्यंत मोफत पाणी वाटप करुन अनोख्या उपक्रमाची सुरुवात केली. रमजान महिन्यात अनेक उपक्रम राबवण्यात तरुण सरसावल्याचे दिसून आले.
शहरातील अनेक मुस्लिम संस्थां व व्यक्तींनी पुढाकार घेत गोरगरीब कुटूंबासाठी आवश्यक कपडे, किराणा किट वाटप केले. तर येथील अक्रम जरगर मित्र मंडळाने हिंदू मुस्लिम बांधवासाठी रोजा इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन केले. पोलिस (Police) दला तर्फे आयोजित इफ्तार पार्टीत शहरातील हजरत टिपू सुल्तान जयंती उत्सव समितीने हिंदू बांधवांसाठी पवित्र कुराणच्या प्रति वाटून इस्लाम संपुर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी असल्याचा संदेश दिला. येथील नगरसेवक शेख गफार यांनी गोरगरीबांना किराणा किटचे वाटप केले. तर मुस्लिम कुटूंबातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी येथील अल हबीब जकात फांऊडेशनने शैक्षणिक चळवळ यशस्वी करण्याचा प्रयत्न सुरु केला.
यातच येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते सुधीर शिनगारे यांनी प्रभाग सात मधील गरीब मुस्लिम कुटूंबियांना ईदसाठी आवश्यक सामुग्री असलेल्या किराणा किटचे वाटप केले. इस्लाममधील ईदच्या नमाज पठणापुर्वी जकात, फितरा व दान धर्म करण्याच्या नियमानुसार ईदच्या पुर्वसंध्येला थेट लाभार्थ्यांना याचे वाटप करण्यात आले. सुधीर शिनगारे यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे. एकीकडे दोन समाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न होत असताना धारुर शहरात राबविण्यात आलेल्या या अनोख्या उपक्रमातातून राष्ट्रीय ऐक्याचा महत्वाचा संदेश देण्यात आला.
( In Dharur, the youth carried out a national unity initiative. )