डॉ. फपाळ यांचा शोध घेणारा एनडीआरएफ जवान बेपत्ता ; मासेमारीच्या जाळ्यात अडकल्याची शक्यता.

माजलगाव दि.19 सप्टेंबर – डॉ. फपाळ यांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफचे पथक माजलगाव धरणाच्या जलाशयात दाखल झाले आहेत. काल रविवारी बुडालेले डॉ. दत्ता फपाळ यांचा मृतदेह शोधण्यासाठी प्रयत्न करणारा एक जवान पाण्यात बुडाला आहे. सदर जवान मासेमारीसाठी लावलेल्या जाळ्यात अडकला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनीही घटनास्थळी धाव घेतली आहे.
( NDRF jawan missing in search of Dr. Phapal; Chances of being caught in a fishing net. )
काल दि.18 रविवारी धारुर (Dharur) तालुक्यातील तेलगाव येथील सुप्रसिद्ध वैद्यकीय व्यवसायिक डॉ. दत्तात्रय फपाळ हे माजलगाव धरणात पोहत असताना बुडाल्याची घटना घडली. त्यांच्या मृतदेहाचा शोध काल सकाळपासून घेण्यात येत आहे. मात्र अद्यापपर्यंत त्यांचा शोध लागला नाही. यासाठी विशेष करुन कोल्हापूरहून एनडीआरएफच्या (NDRF) बचाव पथकाला पाचारण करण्यात आलेले आहे. बचाव पथकाचे शोधकार्य सुरु असताना धक्कादायक माहिती समोर आली आहे. या बचाव पथकातील दोन जवान पाण्यात बुडाली. यातील एका जवानास बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र एक जवान बेपत्ता असून मासेमारीच्या जाळ्यात अडकून बुडाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनास्थळी उपजिल्हाधिकारी निलम बाफना, तहसीलदार वर्षा मनाळे, न.प. मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्यासह पोलीस तळ ठोकून आहेत. मासे मारीसाठी लावण्यात आलेल्या जाळ्यात जवान अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
माजलगाव धरणात (Majalgoan Dam) मागील 26 तासांपासून बीड, परळी येथील बचाव पथक (rescue team) शोध घेत आहेत. परंतु अद्याप त्यांना शोधण्यात यश आले नाही. आज सकाळी शोध घेण्यासाठी कोल्हापूर (Kolhapur) येथील पथक पाचारण करण्यात आले. सकाळी या पथकाने धरणात उतरून आपलं काम सुरू केले. या दरम्यान धरणात मासेमारीसाठी लावण्यात आलेल्या जाळ्यात कोल्हापूर येथील दोन जवान अडकले. त्यातील शुभम काटकर यांना बाहेर काढण्यात यश आले. त्यांना एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु राजु मोरे या जवानाला जाळ्यातून ओढून काढताना त्यांचा ऑक्सिजन सिलिंडर (Oxygen cylinder) निघून वर आला परंतु मोरे बुडाले आहेत. त्यांचाही शोध सध्या घेण्यात येत आहे. घटनास्थळी मोठी गर्दी जमलेली असून या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.