किल्लेधारूरचे आंदोलन ठरले चर्चेचा विषय; नदीपात्रामध्ये केले बैठे आंदोलन.

किल्लेधारुर दि.17 अॉक्टोंबर – तालुक्यातील पहाडी दहिफळ येथील ग्रामस्थांनी नदीपात्रातून जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा या मागणीसाठी शुक्रवारी (दि.15) कुंडलिका नदीपात्रात बैठे आंदोलन केले. या आंदोलनाची चांगलीच चर्चा होत असून प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
(Killedharur agitation became a topic of discussion; Sitting movement in the river basin.)
धारुर (Dharur) तालुक्यातील पहाडी दहिफळ येथील शेतकऱ्यांची जमीन कुंडलिका नदीमुळे (Kundlika River) दोन भागात विभागलेली आहे. पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक ग्रामस्थांची शेती ही कुंडलिका नदीच्या उत्तर बाजूस आहे. नदीवर मागील दोन वर्षापूर्वी सोन्ना खोटा धरण (Dam) बांधण्यात आलेले आहे. धरण भरल्यास अचानक नदीपात्रात पाणी सोडण्यात येते. पात्रात पाणी सोडल्यामुळे केव्हाही नदीला पूर येतो. पहाडी दहिफळ येथील ग्रामस्थ शेती कसण्यासाठी नदीपात्रातून नेहमी ये-जा करतात. तसेच गावांतर्गत धनगर वस्ती नदीपात्राच्या उत्तरेस आहे. येथे शंभरच्या जवळपास लोकवस्ती आहे.
वस्तीवरील ग्रामस्थांना विविध कामांसाठी नदी ओलांडून गावामध्ये जावे लागते. तसेच गावातील नागरिकांना शेती कसण्यासाठी नदी ओलांडूनच शेतात जावे लागते. परंतु नदीला येणाऱ्या अचानक पुरामुळे तसेच अधिकच्या पाण्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. महिलांना नदी ओलांडताना जीव मुठीत धरून चालावे लागते. येथील प्रश्न कोल्हापुरी बंधारा बांधून मार्गी लावावा यासाठी ग्रामस्थांनी अनेक वेळा जिल्हाधिकारी (collector) तसेच संबंधित पाटबंधारे विभागाला (Irrigation Department) निवेदने दिली आहेत. पाटबंधारे विभागाकडून नदीपात्रात कोल्हापुरी बंधारा बांधून त्यावर रस्ता तयार करून ग्रामस्थांचा प्रश्न सोडवण्यासाठी गतवर्षी सर्वेक्षणही (survey) करण्यात आले होते.
परंतु अद्याप या रस्त्याचा प्रश्न मार्गी न लागल्यामुळे धनगर वस्ती तसेच पहाडी दहिफळ येथील ग्रामस्थांनी शुक्रवारी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेदरम्यान नदीपात्रामध्ये बैठे आंदोलन केले. 30-40 ग्रामस्थ पाण्यात तीन तास बसून होते. येथील मंडळ अधिकारी श्री.वाघमारे व तलाठी श्रीमती आलुरे यांनी जाऊन ग्रामस्थांची समजूत काढली. संबंधित पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनाही दूरध्वनीवरून संपर्क साधून या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ग्रामस्थांशी बोलणे करून दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.