
अंबाजोगाई दि.१७ (प्रतिनिधी) अंबाजोगाईत महसूल प्रशासनातील उच्च पदस्थ महिला अधिकारी कोरोना बाधित झाल्याचे रात्री आलेल्या अहवालात निष्पन्न झाले. आरोग्य प्रशासनाने बाधित महिले अधिकाऱ्याच्या संपर्कात आलेल्या विविध विभागातील ४० कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन केले आहे. सदरील अधिकाऱ्यांनी रविवारी अंबाजोगाई, परळी, केज, धारूर व माजलगाव येथील महसूल, कृषी, वन विभागांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेतली होती. यामुळे बैठकीस उपस्थित कर्मचाऱ्यांची धडधड वाढली असुन आरोग्य विभागाकडून संपर्कातील लोकांचा शोध सुरु असल्याची माहीती मिळाली.
महसूल प्रशासनातील उच्च पदस्थ महिला अधिकाऱ्याची मैत्रीण व मुलगा भेटण्यासाठी अंबाजोगाईच्या विमल सृष्टी या परिसरात आले होते. अंबाजोगाईत आल्यानंतर ती मैत्रीण महिला बाधित निघाली. त्यानंतर त्या उच्च पदस्थ अधिकारी महिलेचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आल्यानंतर ती महिला अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्या. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या चाळीस जणांना आरोग्य विभागाने क्वारंटाईन होण्याच्या सूचना दिल्या आहेत. संपर्कातील व्यक्तींचा शोध आरोग्य विभागाच्या वतीने सुरू आहे. या महिला अधिकारी यांनी रविवारी अंबाजोगाईच्या एका कार्यालयात बैठक बोलावली होती. या बैठकीस अंबाजोगाई, परळी, केज, धारूर व माजलगाव येथील महसूल, कृषी, वन विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या शिवाय अंबाजोगाई येथील विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते. या बैठकीतील कोणाकोणाचा संपर्क आला याचा शोध आरोग्य विभागाच्या वतीने सुरू आहे. यामुळे बैठकीस उपस्थित राहिलेल्या अधिकारी, कर्मचारी व सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची धडधड वाढली असल्याचे दिसत आहे.