माझं गाव

महाडीबीटी पोर्टल योजना – अर्ज एक योजना अनेक …

किल्लेधारूर दि.13 मे – महा-डीबीटी पोर्टलवर (MahaDBT Portal) “शेतकरी योजना” या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयी करिता सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे. 20 मे पर्यंत या योजनेत अर्ज करता येणार आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन तालूका कृषी अधिकारी एस. डी. शिनगारे यांनी केले आहे.

(MahaDBT Portal Scheme – Application One Scheme Many …)

या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले असून शेतकऱ्यांनी शेती निगडीत विविध बाबीं करिता अर्ज करावयाचा आहे. राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टल वर “शेतकरी योजना” (Shetkari Yojana) या शीर्षका अंतर्गत “बियाणे” या घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या सुविधेअंतर्गत लाभार्थीनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान या योजनेतील सोयाबीन, भात, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी इत्यादी अनुदानावर बियाणे उपलब्ध होणार असून दि.20 मे 2021 पर्यंत शेतकऱ्याने अर्ज करणे बंधनकारक आहे. महाडीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in/हे संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावरील “शेतकरी योजना” (Shetkari Yojana) हा पर्याय निवडावा.

शेतकरी स्वतःच्या मोबाईल, संगणक/लॅपटॉप/टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इ. माध्यमातून संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतील. “वैयक्तिक लाभार्थी” म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक या संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा लागेल.

ज्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी व हा नोंदणी क्रमांक महाडीबीटी पोर्टलमध्ये (MahaDBT Portal) नमूद करून त्यांना योजनांसाठी अर्ज करता येईल. अशा अर्जदारांना अनुदान वितरीत करण्यापूर्वी महा- डीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करून प्रमाणित करून घ्यावा लागेल. त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही.

या कामासाठी आपण आपल्या जवळच्या सामूहिक सेवा केंद्राची मदत घेऊ शकता तसेच यामध्ये कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास helpdeskdbtfarmer@gmail.com या ई-मेल वर किंवा 020- 25511479 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन किल्लेधारूर तालुका कृषी अधिकारी एस. डी. शिनगारे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!