अनलॉक 5 मधील गाईडलाईन्सला 30 नोव्हेंबरपर्यंत वाढ; दिवाळीतही असणार निर्बंध

मुंबई : दि.३०- केंद्रापाठोपाठ राज्य सरकारकडूनही अनलॉक 5 गाईडलाईन्सला (Unlock 5 guidelines) 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून दिवाळी देखील पुर्वीप्रमाणेच निर्बंधात साजरी होणार हे स्पष्ट झाले आहे. याआधी केंद्रीय गृह मंत्रालयाने अनलॉक 6 (Unlock 6) साठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. त्याअंतर्गत आता राज्य सरकारनेही अनलॉक 5 (Unlock 5) मधील गाईडलाईन्स 30 नोव्हेंबरपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
जारी केलेल्या गाईडलाईन्स नुसार, कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाऊन 30 नोव्हेंबर पर्यंत सुरू राहणार आहे. आंतरराज्यीय वाहतुकीवर कोणतेही बंधन नाहीत. कोविड नियम पाळून 100 लोकांच्या उपस्थितीत सार्वजनिक कार्यक्रम करण्याची मुभा देण्यात आली आहे. थिएटर, शाळा, राजकीय सभा, धार्मिक कार्यक्रम आणि इतर कार्यक्रमांना अटीसह सूट देण्यात आलेली आहे. स्विमिंग पूल मात्र बंदच राहणार आहेत. मोठ्या संख्येने लोक एकत्र जमण्याच्या काही विशिष्ट प्रसंगांमध्ये काही निर्बंधांसह परवानगी देण्यात आली आहे. मेट्रो रेल्वे, शॉपिंग मॉल्स, हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि आतिथ्य सेवा, धार्मिक स्थळे, योग आणि प्रशिक्षण संस्था, व्यायामशाळा, चित्रपटगृहे, मनोरंजन पार्क येथे आरोग्य आणि सुरक्षिततेच्या खबरदारीबाबत कार्य पद्धतीचे पालन अनिवार्य असणार आहे.
कोविड (Covid-19) संसर्गाचा धोका जास्त प्रमाणात असलेल्या काही सेवांच्या बाबतीत, राज्य व केंद्रशासित प्रदेश सरकारला परिस्थितीचे मूल्यमापन करून त्या पुन्हा उघडण्याबाबत निर्णय घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये शाळा आणि कोचिंग संस्था, संशोधन अभ्यासकांसाठी राज्य आणि खासगी विद्यापीठे,100 पेक्षा अधिक जमावाला परवानगी यांचा समावेश आहे. हळूहळू जनजीवन पुर्वपदावर येत असुन राज्यात कोरोना (Covid-19) बाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होवून बरे होणाऱ्यांची टक्केवारी वाढली आहे. मात्र संभाव्य धोका पाहता सरकारने अनलॉक 5 (Unlock 5) मधील निर्बंध अनलॉक 6 (Unlock 6) मध्ये कायम करत ३० नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे.