नारायण राणे यांना अटक; महाड पोलिसांनी घेतला ताबा… उद्या रायगड सत्र न्यायालयासमोर करणार हजर.

रत्नागिरी दि.24 अॉगस्ट – केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. नारायण राणे यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांचं एक पथक कोकणाकडे रवाना झालं होतं. दरम्यान जेवत असताना राणे यांना पोलिसांनी धक्काबुक्की झाल्याचे सांगितले जात असून महाड पोलिसांनी राणे यांना ताब्यात घेवून महाडकडे रवाना झाले आहेत. तर उद्या राणे यांना रायगड सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याचे पोलिस सुत्रांकडून कळलं आहे.
(Narayan Rane arrested; Mahad police took possession.)
नारायण राणे यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, रत्नागिरी न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. तर उच्च न्यायालयानेही (High Court) तातडीची सुनावणी घेण्यास नकार दिला होता. त्यानंतर पोलिसांनी नारायण राणे यांना ताब्यात घेतले आहे. संगमेश्वर पोलिस स्टेशनला त्यांना नेण्यात आले. येथून महाड पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.
पोलीस अधीक्षक अटकेसाठी पोहोचले, पण त्यांच्याकडे अटक वॉरंट किंवा कारवाईसाठी अन्य कोणतेही अधिकृत कागदपत्रे नसल्याने राणेंनी बाहेर येण्यास नकार दिला होता. मात्र आता नारायण राणे यांना पोलिसांनी (Police) ताब्यात घेतलं आहे. नारायण राणे (Narayan Rane) त्यांच्याच गाडीतून पोलिसांबरोबर रवाना झाले आहेत. यावेळी निलेश राणे (Nilesh Rane) यांनी गाडी अडवण्याचा प्रयत्न केला होता. नारायण राणे यांना ताब्यात घेतल्यानंतर भाजप (BJP) कार्यकर्ते आक्रमक झाले असून परिस्थिती चिघळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, अमित शहा (Amit Shah) यांनी फोनवरून नारायण राणेंना त्यांच्या बरोबर असल्याचे सांगत मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
काय आहे प्रकरण?
जनआशीर्वाद यात्रेदरम्यान (Jan Ashirwad Yatra) बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना कानशिलात लगावण्याचं वक्तव्य केलं होतं. काल रायगडमधील महाड येथे या यात्रेदरम्यान त्यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला. त्यांच्या याच वक्तव्यावरुन त्यांच्याविरोधात नाशिक आणि महाडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात शिवसेना कार्यकर्त्यांनी राणे यांचा तीव्र निषेध नोंदवला आहे. ठिकठिकाणी राणे यांच्या प्रतिमेस जोडे मारो व पुतळा जाळण्याच्या घटना घडल्या आहेत. औरंगाबादमध्येही शिवसेनेने (Shiv sena) नारायण राणेंविरोधात आंदोलन केले. नाशिक शहराचे शिवसेनेचे शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्या तक्रारीनंतर नारायण राणेंविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर नाशिक (Nashik) पोलिसांनी नारायण राणे यांच्या अटकेचे आदेश काढले.