‘त्या’ मयतांच्या कुटूंबियांना 16 लाखाची मदत; एचपीएम कंपनीवरील रोषानंतर कंपनीचा निर्णय.

केज दि.11 मे – केज शहरातील धारुर रस्त्यावर भवानी चौकात रविवारी अपघात होवून दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला होता. यानंतर नागरीकांतून रस्ताकाम करणाऱ्या एचपीएम कंपनीवर प्रचंड रोष दाखवत गुन्हा नोंद करण्यासाठी पोलिस ठाण्यात जमाव जमला होता. या रोषानंतर अपघातातील मयत तरुणांच्या कुटूंबियांना एचपीएम कंपनीकडून सोळा लाखाची मदत मंगळवारी (दि.10) देण्यात आली.
रविवारी (दि.8) दुपारी 4 च्या सुमारास ट्रक, ट्रॅक्टर, बुलेट व एक कार असे चार वाहनांच्या विचित्र अपघाताची घटना केज शहरातील भवानी चौकात घडली होती. यामध्ये बुलेट वरील दोन तरूण ट्रकखाली दबून जागीच ठार झाले. या अपघातानंतर रस्त्याचे काम करणाऱ्या एचपीएम कंपनीवर नागरिकांतून प्रचंड रोष व्यक्त करण्यात आला. तसेच एचपीएम कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावं म्हणून जमावाने केज पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले.
केज शहरातून दोन राष्ट्रीय महामार्ग जात आहेत. यातील अंबाजोगाई ते मांजरसुंबा या राष्ट्रीय महामार्ग क्र.548 डी या मार्गाचे काम एचपीएम कंपनी करत आहे. गेल्या दोन वर्षांपासुन संथगतीने शहरातील काम होत असून ठिकठिकाणी खोदकाम केल्यामुळे हा रस्ता अपघाताचे कारण होत आहे. या अर्धवट रस्त्यावर यापुर्वीही अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
केज शहरातील भवानी चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक या दोन्ही चौकातील काम पुर्ण झालेले नाही. त्यामुळे येथे सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. प्रशासन व एचपीएम कंपनीकडे यापुर्वी नागरीकांनी तात्काळ काम करण्यासाठी निवेदनाद्वारे मागणी केली असतानाही याकडे दुर्लक्ष होत आहे. यातच रविवारी (दि.8) रोजी दुपारी 4 वाजता भीषण अपघातात दोन तरुणांना जीव गमवावा लागला.
ऊस घेऊन धारुर कडून आलेल्या भरधाव ट्रकने अंबाजोगाईच्या दिशेने चाललेल्या ट्रॅक्टरला धडक दिली. नंतर तो पलटी होऊन बुलेटवर कोसळला. बुलेट ट्रकच्या खाली आल्याने त्यावरील शेख जुबेर, कुरेशी शहेबाज हे दोघं जागीच ठार झाले. यानंतर संतप्त जमावाने मृतदेह पोलीस ठाण्यात ठेवून एचपीएम कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावं म्हणून ठिय्या आंदोलन केले.
एएसपी पंकज कुमावत यांच्या आश्वासनानंतर जमाव शांत झाला व आंदोलन मागे घेण्यात आले. सोमवारी ( दि.9 ) एचपीएम कंपनीनेही घटनेचं गांभीर्य ओळखून दोन्ही मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर केली. मयत तरुणांच्या कुटूंबियांना प्रत्येकी 8 लाख असे 16 लाख रुपयांचे धनादेश ( चेक ) तयार करुन ते बाय पोस्ट कुटुंबियांच्या नावे पाठविण्यात आले आहेत. अशी माहिती भ्रष्टाचार निर्मूलनचे मराठवाडा अध्यक्ष सादेक इनामदार यांनी दिली आहे. मयत तरुणांच्या कुटूंबियांची घरातील तरुण मुलं गेल्याने मोठी हानी झाली असून न भरुन येणारे नुकसान झाले आहे. या पिडित कुटूंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी केज, धारुर येथील राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांनी मोठे कष्ट घेतले असल्याने हे शक्य झाल्याचे इनामदार यांनी सांगितले.
( 16 lakh assistance to the families of ‘those’ deceased; Company decision after outrage over HPM company. )