पवित्र रमजानचे रोजे व तरावीह घरात राहूनच करा- मौलाना महेमूद मदनी
एकजूटीने कोरोनावर मात करा-मौलाना

दिल्ली दि.१८(प्रतिनिधी) जमैयते उलेमाऐ हिंदचे जनरल सेक्रेटरी माजी संसद सदस्य मौलाना महेमुद मदनी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील मुस्लिमांनी घरात राहून येत्या पवित्र रमजान महिन्याचे रोजे, तरावीह व इबादत करावी असे आवाहन एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले.
रेशमी रुमाल आंदोलनाचे जनक शेख महेमुदूर हसन यांचे वंशज देशभर मोठ्या प्रमाणात समर्थक असणारे राज्यसभेचे माजी खासदार तथा जागतिक पातळीवर नावाजलेल्या जमैयते उलेमाऐ हिंदचे जनरल सेक्रेटरी मौलाना महेमुद मदनी यांची एका वृत्तवाहिनीवर मुलाखत प्रसारीत झाली. यावेळी कोरोना संकटावर मात करण्यासाठी सर्व जाती धर्माच्या भिंती सोडून एकत्र लढण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. एका प्रश्नावर बोलताना एखाद्या कार्यक्रमामुळे घडलेल्या घटनेकडे पाहताना संपूर्ण समाजाला दोष देणे चुकीचे असुन आलेले कोरोनाचे संकट एकजूटीने दुर करण्यासाठी सर्वानी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले. पुढे बोलताना त्यांनी या संकटात जनसेवा करणाऱ्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचे कौतूक करत जनतेने स्वंयस्फुर्तिने मदतीसाठी सहभाग घ्यावा असेही ते म्हणाले. काही दिवसावर आलेल्या पवित्र रमजान महिन्यात मुस्लिमाने रोजे व तराविह घरात राहूनच करावे व प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. मौलाना महेमुद मदनी हे भारतासह इतर देशातही नावाजलेले असून त्यांना माननारा मुस्लिम समाजात मोठा समुह आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मन की बात कार्यक्रमात मौलाना मदनी यांच्या गुजरात मधील कार्याचे कौतूक केलेले आहे.