आता बसस्थानकात ॲन्टीजेन टेस्ट; नसता एसटी प्रवास टळणार.

मुंबई दि.30 मे – कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याची चिन्हे असतानाच तिसऱ्या लाटेची भीतीही वर्तविली जात आहे. ही लाट थोपवून धरण्यासाठी विविध पातळ्यांवरून प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून एसटी प्रवाशांचीही ॲन्टीजेन टेस्ट (Antigen test) नागपूरात सुरू करण्यात आली आहे. नागपूरमध्ये गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानकावर (Bus stand) ही तपासणी केली जात आहे. कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) रुग्ण आढळून आल्यास प्रवासाची परवानगी नाकारून त्यांना परत पाठवले जाणार आहे. हा प्रयोग हळूहळू एसटी बस सेवा सुरु केल्यानंतर सगळीकडे होण्याची शक्यता आहे.
(Now antigen test at bus stop; Otherwise ST travel will be avoided.)
कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रीटमेंट या त्रिसूत्रीवर भर दिला जातो. विमानतळ, रेल्वेस्थानकावर पूर्वीच तपासणी सुरू करण्यात आली आहे. सध्या एसटीतून केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व अत्यावश्यक कारण असणाऱ्यांनाच प्रवासाची मुभा आहे. अनेक जिल्ह्यात एसटी बस प्रवासी वाहतूक ठप्प आहे. नागपूरमध्ये काही ठिकाणी एसटी प्रवासी वाहतूक सुरु आहे. त्यातही प्रवास करणाऱ्यांच्या हातावर विलगीकरणाचा ठप्पा लावला जातो. एसटीतून कोरोनाचा प्रसार होऊ नये यादृष्टीनेही आता प्रवाशांच्या तपासणीचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेच्या सूचनेनुसार फलाटावर तपासणीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाकडून बुधवारपासून येणारे व जाणाऱ्या प्रवाशांची तपासणी बस स्थानकात (Bus stand) केली जात आहे. आपत्कालीन सेवेतील कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त प्रत्येकाची तपासणी व्हावी असा प्रयत्न करण्यात येत आहे. पथकाला दररोज दोनशे ते अडीचशे किट उपलब्ध करून दिल्या जातात. तेवढ्या किट असेपर्यंत मनपाची चमू तपासण्या करते. त्यानंतरच्या प्रवाशांना मात्र तपासणी न करताही एसटीतून प्रवासाची मुभा आहे. अवघ्या दहा मिनिटांमध्ये अहवाल येत असल्याने बसस्थानकावर ॲन्टीजेन टेस्ट (Antigen test) केली जात आहे. चाचणीत कोरोना संसर्ग असल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांना प्रवास नाकारून घरी पाठविले जाणार असून महापालिकेकडून पुढील पाठपुरावा करण्यात येणार आहे.
प्रवासी घटण्याची शक्यता
बुधवारी पहिल्या दिवशी दीडशे, दुसऱ्या दिवशी अडीचशे व शुक्रवारी सुमारे दोनशे प्रवाशांची तपासणी करण्यात आली. तीन दिवसांमध्ये कुणीही कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आढळून आले नाही. यामुळे प्रत्येकाला प्रवासच करता आला. पण, अनेकांना चाचणीची धास्ती आहे. यामुळे आधीच अत्यंत कमी असलेली प्रवासी संख्या आणखीच घटण्याची शक्यता एसटी कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांनीही व्यक्त केली.
फेऱ्या झाल्या दुप्पट
एरवी गणेशपेठ येथून दरदिवशी बाराशे फेऱ्या होत असत. कोरोनाचा हाहाकार सुरू असताना फेऱ्यांची संख्या अवघी 24-25 एवढी मर्यादित झाली होती. चंद्रपूर, अमरावती, वर्धा, यवतमाळ येथील एसटीसेवा पुन्हा बहाल झाल्याने तिथून काही फेऱ्या सुरू झाल्या आहेत. परिणामी गणेशपेठहून होणाऱ्या फेऱ्यांची संख्या 50 च्या वर गेली आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये फेऱ्यांची संख्या गतीने वाढेल असा विश्वास अधिकारी वर्गातून व्यक्त होत आहे. राज्यातील रुग्ण संख्या झपाट्याने कमी होत असल्याने एसटी प्रवासी वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.