BEED24

अन क्षीरसागर कुटुंबियातील राजकीय दुरावे गळून पडले..! रेखाताईच्या निरोपासाठी जनसागर लोटला.

बीड दि.21 एप्रिल – बीडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार संदीप क्षीरसागर (MLA Sandeep Kshirsagar) यांच्या मातोश्री तथा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या रेखाताई रवींद्र क्षीरसागर ( Rekha Kshirsagar ) यांचे बुधवारी रात्री निधन झाले. आज हजारोंच्या साक्षीने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी क्षीरसागर कुटुंबियातील सर्व राजकीय दुरावे गळून पडल्याचे चित्र दिसून आले.

काल दि.20 बुधवारी संध्याकाळी साडे सात वाजेच्या सुमारास आमदार संदीप क्षीरसागर यांच्या आई रेखाताई रवींद्र क्षीरसागर यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तात्काळ उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र तोपर्यंत रेखाताई यांची प्राणज्योत मालवली होती. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांचे निधन झाल्याचे अधिकृतपणे घोषित केले.

आज दि.21 गुरुवारी सकाळपासूनच रेखाताई क्षीरसागर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यासोबतच दुःखाचा डोंगर कोसळल्यामुळे क्षीरसागर कुटुंबियातील राजकीय दुरावे यावेळी गळून पडले होते. रेखाताईंच्या निधनानंतर जयदत्त क्षीरसागर (Jaidatta Kshirsagar) यांनी बंधू रवींद्र क्षीरसागर यांचे सांत्वन केले.

रेखाताई क्षीरसागर या आध्यात्मिक व धार्मिक वृत्तीच्या असल्याने त्यांचा बीडमध्ये मोठा जनसंपर्क होता. अध्यात्म आणि योगाच्या प्रसारासाठी त्यांनी जिल्हाभर दौरे केले होते. नवगण राजूरी या गावाचे त्यांनी अनेक वर्षे सरपंचपदही भूषवले आहे. मागील जिल्हा परिषद निवडणुकीत काकू-नाना विकास आघाडीकडून त्या बहिरवाडी जिल्हा परिषद गटातून विजयी झाल्या होत्या.

रेखाताई क्षीरसागर यांच्या पार्थिवावर आज गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी मोठा जनसागर लोटला होता. नवगण राजूरी येथील त्यांच्या मूळ गावी त्यांना निरोप देण्यात आला. एरवी राजकीय मैदानावर एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले पुतणे संदीप क्षीरसागर आणि काका जयदत्त क्षीरसागर या दुःखद प्रसंगी एकत्र आलेले दिसून आले. आईला निरोप देताना आमदार संदीप यांना अश्रू अनावर झाले होते.

जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी क्षीरसागर कुटुंबियांचे सांत्वन केले. अंत्यविधीसाठी बीड (Beed) जिल्ह्यातून राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करणारे अनेक व्यक्तींची उपस्थिती होती. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर (Jaydatta Kshirsagar) यावेळी कुटूंब प्रमुखाच्या भुमिकेत दिसून आले. त्यांनी बंधू रवींद्र क्षीरसागर यांना या दुःखद प्रसंगी आधार दिला.

( Political distance between Kshirsagar family fell ..! Crowds flocked to Rekhatai’s funeral. )

Exit mobile version