प्रवीण दरेकरांच्या गौप्यस्फोटाने खळबळ; तो आमदार कोण?… राजकीय चर्चेला आले उधाण…

मुंबई : दि.3 मार्च- राज्य विधी मंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारला घेरण्यासाठी भारतीय जनता (BJP) पक्षातर्फे जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी सत्ताधारी पक्षाच्या आणखी एका आमदारावर गंभीर आरोप केला आहे. राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde), शिवसेनेचे मंत्री आणि आमदार संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या नंतर विरोधकांच्या निशाण्यावर कोण आहेत असा प्रश्न जनतेला पडला आहे.
(Sensation by Praveen Darekar’s secret blast; Who is that MLA?)
गेल्या काही दिवसांपासून कलाकार रेणू शर्मा कथित बलात्कार प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) अडचणीत आले होते. याप्रकरणी राज्यातील बड्या नेत्यांनाही प्रतिक्रीया देणे भाग पडले होते. धनंजय मुंडे यांचे प्रकरण निवळल्यानंतर टीकटॉकस्टार पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी (Pooja Chavhan suicide case) शिवसेनेचे आमदार आणि मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांना राजीनामा (resignation) द्यावा लागला आहे. या प्रकरणात संजय राठोड यांचे नाव जोडले गेल्याने भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी आक्रमकपणे लावून धरली होती. आता विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी महाविकास आघाडीतील आणखी एका आमदाराचा पर्दाफाश करणार असल्याचा इशारा दिला असल्याने पुन्हा राजकीय गोटात खळबळ माजली आहे.
प्रवीण दरेकर यांनी विधीमंडळाबाहेर माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना ते म्हणाले, ‘ सत्ताधारी पक्षातील एका आमदाराचा देखील पर्दाफाश आज विधीमंडळात करणार आहे. संबधित आमदाराची डीएनए चाचणी करावी अशी मागणी न्यायालयात प्रलंबित आहेत. तथाकथित पत्नी आणि मुलगा यांनीही त्यांच्या डिएनए टेस्ट मागणी केली होती.
परंतू पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नाही. सरकारने या आमदाराची चौकशी करावी. अशी मागणी सभागृहात करणार आहे, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणीदेखील तू मारल्यासारखे कर, तू रडल्यासारखे कर. असे सुरू आहे. त्यामुळे संजय राठोडांचा राजीनामा (resignation) राज्यपालांकडे पाठवला जात नाहीये’.
महाविकास आघाडीचा आणखी कोणता नेता किंवा आमदार भाजपच्या निशाण्यावर आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधीमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्यासाठी भाजप चांगलाच आक्रमक झालेला सध्या दिसून येत आहे. दरेकरांच्या गौप्यस्फोटातील तो आमदार कोण? याची उत्सूकता सर्वांना लागली आहे.