सचिन वाझेकडून खळबळजनक गौप्यस्फोट; पत्रातून अनिल देशमुखांसह आणखी दोन मंत्र्यांचा केला उल्लेख … अनिल परब यांचा खुलासा.

मुंबई दि.7 एप्रिल – गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांकडून आठ दिवसात आणखी एका मंत्र्याची विकेट पडणार असल्याचा सुतोवा करण्यात येत होता. याची प्रचिती आज आली असून मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं ठेवल्याप्रकरणी राष्ट्रीय यंत्रणेच्या (NIA) ताब्यात असलेले सचिन वाझे (Sachin Waze) यांनी आज मोठा गौप्यस्फोट केला आहे. वाझेंनी कोर्टापुढे हस्तलिखित पत्र सादर करत तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांनी आपल्याकडे 2 कोटींची मागणी केल्याचं वाझेनी सांगितलं आहे. त्याबरोबरच आणखी एका शिवसेना मंत्री अनिल परब (Anil Parab) यांचे नावही या जबाबात वाझेंनी घेतल्याने खळबळ उडाली आहे.
(Sensational assassination attempt by Sachin Waze; The letter mentioned Anil Deshmukh and two other ministers … Anil Parab’s revelation.)
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर आता अनिल देशमुखांवर सचिन वाझे यांनीही मोठा आरोप केला आहे. सचिन वाझे (Sachin Waze) यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेला एक पत्र लिहून अनिल देशमुख यांनी 2 कोटी रुपये खंडणी मागितली होती. असा खळबळजनक आरोप केला आहे. या सर्व प्रकरणामुळे आता अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणीत मोठी वाढ होणार असल्याचं पाहायला मिळत आहे.
परमबीर सिंह (Param Bir Singh) यांच्या लेटरबॉम्बनंतर आता निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याने ही लेटर लिहून अनिल देशमुखांवर आरोप केला. ‘माझ्या नियुक्तीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोध केला होता आणि ते मला पदावर ठेवण्यास इच्छुक नव्हते, त्यांचं मत बदलण्यासाठी अनिल देशमुख यांनी मला 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती’, असा आरोप सचिन वाझेनी केला आहे.
निलंबित पोलिस अधिकाऱ्याने केलेल्या या आरोपानंतर अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. सध्या अनिल देशमुखांवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाचा तपास मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर अनिल देशमुख यांनी आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला.
‘निलंबन टाळायचं असेल तर दोन कोटी द्या’, अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुखांनी आपल्याकडे केल्याचं वाझे यांनी म्हटलं आहे. ‘आपल्याला एवढी मोठी रक्कम देता येणार नसल्याचं सांगितलं. त्याबरोबरच अनिल देशमुखांनी प्रत्येक बारमधून साडेतीन लाख वसूल करून आणा’, असंही सांगितल्याचं सचिन वाझेनी नमूद केलं आहे. वाझेंच्या जबाबामध्ये शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांचंही नाव आहे. अनिल परब (Anil Parab) यांनीही आपल्याला खंडणी वसून करायला सांगितलं, असा खळबळजनक आरोप वाझेंनी कोर्टापुढे सादर केलेल्या पत्रातून केला आहे.
याची माहिती तत्कालीन पोलीस आयुक्तांना दिली होती. त्यांनी या सर्व बेकायदेशीर व्यवहारांपासून दूर राहण्यास सांगितलं होतं, असंही वाझेंनी म्हटलं आहे. अनिल देशमुखांनी तपास थांबवण्यासाठी 50 कोटी मागितले, असाही आरोप करण्यात आला आहे.
वाझेंच्या या पत्रात उपमुख्यमंत्र्यांचाही उल्लेख आहे. वाझेंचं हे पत्र NIA कोर्टाने फेटाळलं असून ते अधिकृत पद्धतीने नोंदवावं, असं कोर्टाने सांगितलं आहे. वाझेंनी अधिकृतपणे कबुलीजबाब नोंदवावा किंवा कायदेशीररीत्या जबाब द्यावा, अशी कोर्टाची अपेक्षा आहे.
नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न- अनिल परब
याबाबत आत्ताच अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेवून हा सरकारला नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया दिली. पत्रकार परिषदेला सुरुवात करताना परब यांनी स्वतःच्या दोन मुंलीसह दैवत असलेल्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेतली. पुढे बोलताना, कोणत्याही चौकशीस सामोरे जाण्यास तयार असून केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन कारस्थान करण्यात येत असल्याचा आरोप भाजपावर केला.