लग्नाचा मांडव कि मतदान केंद्र …. असे ही आदर्श मतदान केंद्र

किल्लेधारूर दि.१६(वार्ताहर) धारुर (Dharur) तालुक्यात ९ वर्ष सेवा केलेल्या एका शिक्षकाने आपल्या जन्मगावी जावून आदर्श मतदान केंद्राची (Polling Booth) संकल्पना राबवत लोकशाही बळकट करुन मतदारात (Voter) जनजागृती करण्याचा अनोखा प्रयत्न केला असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे.
धारुर (Dharur) तालुक्यातील पिंपरवाडा येथील जिल्हा परिषद शाळेत सतत २००४ ते २०१२ अशी ९ वर्ष सेवा देणारे श्री नरेंद्र (Narendra) अमृतकर सध्या गोंदिया (Gondiya) जिल्ह्यातील त्यांच्या मुळगावी कार्यरत आहेत. देवरी तालुक्यातील भागी देवरी या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून काम करत आहेत. काल सर्वत्र ग्रामपंचायत निवडणूकीसाठी मतदान झाले. या शाळेतही गोटाबोरी ग्रामपंचायत अंतर्गत दोन मतदान केंद्र (Polling Booth) होती. सदरील मतदान केंद्र आदर्श मतदान केंद्र करण्यासाठी मुख्याध्यापक असलेल्या नरेंद्र (Narendra) अमृतकर यांनी शिक्षक सुमित चौधरी व अमोल खंडाईत यांच्या मदतीने प्रयत्न केले. मतदान केंद्र रुपी शाळेला अगदी लग्न मांडवा सारखे आकर्षक सजावट करुन मतदारांना प्रसन्न वातावरणात एखाद्या पिकनिक पाँईटवर आल्याचा भास करुन दिला. या मतदान केंद्रात स्वागतासाठी शालेय बालकांना बसवून हँड सॕनिटायझर, मास्क व पुष्पगुच्छ देवून प्रत्येक मतदारांचे स्वागत केले. मतदारांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी, सेल्फी पाँईट, अपंगासाठी व्हीलचेअर, वृध्द व गरोदर महिलांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. परिसर सुखद व आनंदमय करण्यासाठी ठिकठिकाणी तिरंगी फुगे लावून मतदार (Voter) जागृती करणारे श्लोगन लावण्यात आली. केंद्रातील प्रसन्न वातावरण पाहून मतदारांनी मोठ्या उत्साहाने मतदानासाठी सहभाग नोंदवला. बघता बघता सर्वत्र या केंद्राची जोरदार चर्चा झाली. या केंद्राला उपजिल्हाधिकारी राजेश खवने, तहसीलदार विजय बोरुडे यांनी भेट देवून आदर्श मतदान केंद्राचे कौतूक केले. याबाबत बोलताना अमृतकर यांनी मी याच शाळेचा विद्यार्थी आहे. लोकशाही बळकट करुन गावातील लोकांना मतदाना विषयी जनजागृती करण्यासाठी आपल्या सहकारी शिक्षकांच्या संकल्पनेतून आदर्श मतदान केंद्र (Polling Booth) केल्याची प्रतिक्रिया दिली. यावर्षी येथील टक्केवारी वाढून ७५ टक्के मतदान झाले.