धक्कादायक … सचिन वाझेच्या घरात 62 जिवंत काडतुसे सापडली;

मुंबई दि.25 मार्च- मुंबई येथील अंबानी यांच्या बंगल्यासमोर लावलेल्या स्फोटकाची कार व मनसुख हिरेन हत्या प्रकरणी एनआयए (NIA) च्या ताब्यात असलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) प्रकरणात धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. सचिन वाझे याच्या घरात एकूण 62 जिवंत काडतुसे (live cartridges) सापडल्यामुळे एनआयए (NIA) अधिकारी चक्रावून गेले असून याबाबत वाझे माहिती देण्यास टाळाटाळ करत आहे. या संदर्भातील माहिती एनआयए (NIA) ने विशेष कोर्टात दिली आहे.
(Shocking … 62 live cartridges found in Sachin Waze’s house;)
गेल्या काही दिवसांपुर्वी घडलेल्या अंबानी यांच्या बंगल्यासमोर लावण्यात आलेल्या स्फोटक असलेल्या वाहन प्रकरणी राजकीय वातावरण तापले. याच दरम्यान कार मालक मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांचा मृतदेह आढळला. सदरील प्रकरण एनआयए कडे गेल्यानंतर तपासात अनेक खुलासे होत आहेत. वाझे यांच्या घरात 62 जिवंत काडतुसे सापडल्याने खळबळ उडाली. मात्र सचिन वाझेंकडे ही काडतुसे आली कुठून? आणि त्यांनी ही काडतुसे का ठेवली आहेत? याबाबतचं गूढ अधिक वाढत चालले आहे. वाझे याची कोठडी आज संपत असल्यामुळे एनआयए (NIA) ने त्याला विशेष कोर्टात हजर केले. सचिन वाझेंना (Sachin Vaze) पोलीस अधिकारी म्हणून सरकारी कोट्यातून 30 जिवंत काडतुसे देण्यात आली होती. तसेच त्यांना एक रिव्हॉल्वर देण्यात आली होती.
मात्र त्याला देण्यात आलेल्या 30 पैकी पाच बुलेट्स वाझेंकडे आहेत. मात्र 25 काडतुसे गायब आहेत. ही 25 काडतुसे कुठे गेली याबाबत वाझे काहीही माहिती देत नसल्याचेही एनआयए (NIA) ने कोर्टाला सांगितले आहे. तसेच तपासात सहकार्य करत नसल्याचे सुद्धा एनआयए (NIA) अधिकाऱ्यांनी कोर्टात सांगितले आहे.
मनसुख हिरेन (Mansukh Hiren) हत्या प्रकरणात दोन आरोपींना एनआयएने अटक केली आहे. या दोघांना वाझेंच्या समोर बसवून तपास करायचा आहे. त्यामुळे वाझेंची कोठडी वाढवून द्यावी, अशी मागणी एनआयएने केली आहे. त्याशिवाय वाझेंच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले असून त्याचा रिपोर्ट यायचा बाकी आहे. दरम्यान, वाझे याच्या तपासात 62 जिवंत काडतुसे सापडल्याने तपास अधिकाऱ्याना धक्का बसला असून यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, मला बळीचा बकरा केला जातोय म्हणत वाझे याने कोर्टासमोर एनआयएला पोलिस कोठडी वाढवून देवू नये अशी विनंती केली.