धक्कादायक… वडवणी नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला….

वडवणी दि.१९(प्रतिनिधी) वडवणी नगरपंचायतचे मुख्याधिकारी प्रशांत पाटील यांनी स्थापत्य अभियंता सुमितकुमार दिलीपकुमार मेटे यांना तुम्ही लोकांचे काम का करत नाहीत, वेळेवर अहवाल कार्यालयास सादर का करत नाहीत या कारणावरून सुनावले. याचा मनात राग धरून आपल्या दोन साथीदाराच्या मदतीने मुख्याधिकारी (CO) पाटील यांच्यावर लोखंडी राॅड व चाकूने हल्ला करून जखमी केल्याची घटना वडवणी नगरपंचायत कार्यालयासमोर आज दि.१९ मंगळवार रोजी सायंकाळी सात वाजता घडली आहे. सदरील या घटनेने वडवणी (Vadwani) तालुक्यात खळबळ उडाली आहे.
वडवणी (Vadwani) नगरपंचायत चे स्थापत्य अभियंता सुमित कुमार मेटे हे सतत गैरहजर राहून लोकांचे काम करण्यास विलंब करत होते. त्यामुळे अभियंता मेटे यांच्या विरोधात तक्रारी व रोष लोकांमध्ये वाढला होता त्याच अनुषंगाने आज नगरपंचायत कार्यालयात मुख्याधिकारी (CO) प्रशांत पाटील यांनी काम करण्यास विलंब का करतात व अहवाल सादर करण्यास उशीर का करता अशी विचारना करत सुनावले. या प्रकाराचा मनात राग धरून त्यांचे वडील व मामा यांच्या मदतीने मुख्याधिकारी पाटील यांच्यावर लोखंडी राॅड व चाकूने हल्ला केला. भांडण सुरू असताना कर्मचाऱ्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला असता त्यामध्ये कर्मचाऱ्यांना देखील धक्काबुक्की झाल्याचे समजते. ही घटना आज दि. १९ मंगळवार रोजी सायंकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान नगरपंचायत कार्यालय समोर घडली. मुख्याधिकारी पाटील यांच्या हातावर चाकूने वार केला असून पायावर लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली आहे. प्रशांत पाटील यांच्यावर वडवणीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले आहेत. या घटनेतील चाकू व लोखंडी राॅड पोलिसांनी (Police) हस्तगत केला असून याप्रकरणी वडवणी पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.