धक्कादायक…. केज शहरात म्युकर मायकोसिस आजारामुळे एकाचा मृत्यू.

केज दि.24 मे – राज्यात कोरोनाचा उद्रेक सुरू झाल्यापासून आतापर्यंत काळ्या बुरशीमुळे (Black fungus) (म्युकरमायकोसिस) (Mucormycosis) लोकांचा मृत्यू होत आहे. कोरोना बरा होत आल्यानंतर म्युकर मायकोसिसची लागण झाल्याने केज शहरातील एका 55 वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे.
(Shocking …. One dies of mucosal mycosis in Kaij.)
शहरातील समर्थ नगर भागात राहणारे मच्छीन्द्र प्रल्हाद राऊत (55) यांना पंधरा दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र त्या दरम्यान त्यांना इतरही कांही लक्षणे आढळून आल्याने त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबादला पाठवण्यात आले.
औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. मात्र त्यांना म्युकरमायकोसिस आजाराची लागण झाल्याने त्यांची प्रकृती जास्तच खालावत गेली. त्यातच त्यांचा दि. 23 रोजी दुपारी 12 वाजता मृत्यू झाला. म्युकरमायकोसिस आजारामुळे मृत्यू होण्याचे लोन आता बीड जिल्ह्यातही आल्यामुळे जिल्ह्याची चिंता वाढली आहे.
राज्यात कोरोनाचा उद्रेक सुरू झाल्यापासून आतापर्यंत काळ्या बुरशीमुळे (Black fungus) (म्युकरमायकोसिस) (Mucormycosis) 52 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्यात वेगाने पसरणार्या या आजारामुळे एक नवीन संकट निर्माण झाले आहे.
म्युकरमायकोसिस (Mucormycosis) ब्लॅक फंगस हा आजार काही रूग्णांमध्ये कोरोनामुक्त झाल्यानंतर दिसून येत आहे. डोकेदुखी, ताप, डोळा दुखणे, नाकामध्ये संसर्ग होणे आणि दृष्टीदोष सारखी लक्षणे या आजाराच्या रुग्णांमध्ये दिसतात.