निलंबन वाढले… धारुरसह बीड जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई; आज तहसीलवर निदर्शने.

किल्लेधारूर दि.12 नोव्हेंबर – राज्यभर पुकारलेला एसटी कर्मचाऱ्यांचा (ST employees) संप दिवसेंदिवस चिघळतच आहे. दि.10 रोजी धारुरच्या 5 तर बीड (Beed) जिल्ह्यातील 22 एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन (Suspension) करण्यात आले होते. यात काल दि.11 गुरुवारी वाढ होवून धारुरच्या आणखी 5 तर जिल्ह्यातील 65 कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.
(Suspension increased … Action against ST employees in Beed district including Dharur; Demonstrations in tehsil today.)
धारुर (Dharur) येथील एकुण 11 संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर राज्य सरकारने निलंबनाची कारवाई केली आहे. या कारवाईनंतर कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले असून दि.11 गुरुवारी कर्मचाऱ्यांनी सामुहिक मुंडन आंदोलन करत निषेध नोंदवला. कोणतीही कारवाई केली तरी आमचे आंदोलन सुरुच राहील अशी भूमिका संपकऱ्यांनी घेतली असली तरी अनेक कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा संप (Strike) मोडून काढण्यासाठी महामंडळाने कारवाईत वाढ केली असून बुधवारी राज्यात 542 कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले होते. त्यामुळे दोन दिवसांत निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांची एकूण संख्या 918 झाली होती. हि संख्या गुरुवारी संध्याकाळपर्यंत आणखी वाढली असून 2053 जणांवर कारवाई झाली.
संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवरील कारवाई गुरुवारी आणखी तीव्र करण्यात आली. धारुर आगारातील 2 वाहक व 2 चालक व एक लिपिक अशा 5 कर्मचाऱ्यांचे गुरुवारी निलंबन करण्यात आले आहे. तर बीड जिल्ह्यातील बीड आगारातील 4, पाटोदा 4, गेवराई 5, आष्टी 10, माजलगाव 10, परळी 10, अंबाजोगाई 10 तर विभागीय कार्यालय व कार्यशाळेतील 7 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी कर्मचारी यांचे निलंबन करण्यास सरकारने सुरुवात केली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांत संतापाची लाट निर्माण झाली आहे. मंगळवारी अंबाजोगाई येथे तर बुधवारी माजलगाव येथे एसटी कर्मचाऱ्यांनी उपविभागीय कार्यालयावर कुटूंबासह निदर्शने केली. तर धारुरमध्ये जवळपास 25 कर्मचाऱ्यांनी सामुहिक मुंडन आंदोलन केले.
धारुरमध्ये आज तहसील कार्यालयावर निदर्शने.
राज्य शासनाने संपात सहभागी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरु केलेली आहे. या आंदोलनाने आता राजकीय रुपधारण केले असून भाजपासह (BJP) इतर विरोधी पक्षांनी आंदोलनात सहभाग घेतला आहे. बुधवारी धारुर आगारातील कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आल्यानंतर याचा निषेध म्हणून कर्मचाऱ्यांनी सामुहिक मुंडन आंदोलन केले. तर आज येथील तहसील कार्यालयात आज कुटूंबासह निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती कामगार संघटनेचे अध्यक्ष अजय सोनटक्के यांनी दिली.