ST Bus धारुर आगाराला मिळाल्या चार नवीन बसेस ; आणखी पाच लालपरी मिळणार – आ. सोळंके .

किल्लेधारुर दि.2 मे ST Bus धारुर आगाराला नवीन चार बसेसचं आगमन झालं असून आगार प्रमुख नवनाथ चौरे यांच्या हस्ते पुजन करुन महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून जनसेवेत रुजू करण्यात आल्या. नव्या बसेस आल्यामुळे प्रवाशी वर्गात समाधान व्यक्त होत असून आणखीन नव्या लालपरी मिळणार असल्याची माहिती आ. प्रकाशदादा सोळंके यांनी दिली.
महाराष्ट्र मानव विकास कार्यक्रम अंतर्गत धारुर आगाराला चार नवीन बसेस मिळाल्या आहेत. धारुर आगार धारुरसह केज व वडवणी तालुक्यातील प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. या आगारातील बहुतांश बसेस मोडकळीस आलेल्या असल्यामुळे गेली अनेक वर्षांपासून नवीन बसेसची मागणी होती. वडवणी व धारुर तालुका अतिशय दुर्गम भाग असून महाराष्ट्र मानव विकास कार्यक्रमांतर्गत या तालुक्यात शालेय मुलींसाठी निळ्या रंगाच्या बस प्रवासाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या अंतर्गत धारुर आगाराला चार नवीन निळ्या बसेस महामंडळाकडून देण्यात आल्या आहेत. परंतू उत्पनामध्ये जिल्ह्यात नावलौकिक मिळवणाऱ्या धारुर आगाराला सर्वसाधारण प्रवाशांसाठी लालपरी गाड्यांची आवश्यकता आहे. याबाबत माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाशदादा सोळंके यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अनिल महाजन यांनी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केला असता त्यांनी याबाबत पुढील आठ दहा दिवसात आणखी पाच नव्या लालपरी धारुर आगारासाठी उपलब्ध होतील अशी माहिती दिली.