लातूरचे क्लासेस बंद पडल्यामुळे पास मिळविण्यासाठी खटाटोप
पालकांची बाढबिछाना आणण्यासाठी धडपड

किल्लेधारूर दि.५(वार्ताहर) लातूरचे क्लासेस बंद पडल्यामुळे पास मिळविण्यासाठी खटाटोप करत विद्यार्थ्यांचा बाढबिछाना परत आणण्यासाठी पालकांची धडपड पहावयास मिळत आहे. मात्र जिल्हाबंदी असल्याने सर्वांची प्रयत्न व्यर्थ ठरत आहेत.
तालुक्यातील बहूतांश विद्यार्थी शिक्षणासाठी लातूर येथे ठेवण्यास याभागातील पालक पसंती देतात. आजही तालुक्यातील तीनशे ते चारशे विद्यार्थी अकरावी व बारावी चे लातूर येथे शिक्षण घेत आहेत. हजारो रुपये खर्चून पालक अकरावी व बारावीच्या खाजगी शिकवण्या लावून राहण्यासाठी रुम किंवा हॉस्टेल करतात. लॉकडाऊन मुळे लातूर येथील खाजगी शिकवण्या १५ मार्च पासुनच बंद करण्यात आलेल्या आहेत. यात बारावीत शिकणाऱ्या निट व जेईई सारख्या परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला आहे. ऐन परिक्षेच्या तोंडावरच लॉकडाऊन होवून परिक्षेवरच प्रश्न उभे राहिले आहे. जवळजवळ दिड महिना होवुनही लॉकडाऊन सुटले नाही. अद्यापही कोरोनाचे संकट टळले नाही. यामुळे आता थेट परिक्षेलाच गृहीत धरुन शिकवण्या सुरु होण्याची अपेक्षा मंदावली आहे. शिकवणी चालकांनीही अॉनलाईन ॲप देवून विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सुरु केलेले आहे. मात्र पालकांना दोन महिने रुम भाड्याचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. या सर्वातून सुटकेसाठी निट व जेईई च्या पालकांनी रुम सोडून विद्यार्थ्यांचा बाढबिछाना आणण्यासाठी निष्फळ प्रयत्न चालवले असल्याचे दिसुन येत आहे.