रुग्ण संख्या 30 हजार पेक्षा जास्त झाल्यास राज्यात कडक लॉकडाऊन; मुख्य सचिवांचा प्रस्ताव.

मुंबई दि.11 अॉगस्ट – महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. सध्या सर्वत्र कोरोना नियमावलीचे निर्बंध (restrictions) शिथील करण्यात आले आहेत. तसेच कोरोना लसीचे (Corona vaccine) दोन्ही डोस घेतलेल्या सर्वसामान्यांना लोकल प्रवेशाचीही परवानगी देण्यात आली आहे. यामुळे भविष्यात रुग्ण संख्या वाढण्याचा धोका असून राज्याची रुग्ण संख्या 30 हजार पेक्षा जास्त झाल्यास राज्यात कडक लॉकडाऊन (lockdown) लावण्याचा प्रस्ताव बैठकीत मुख्य सचिवांनी मांडला असल्याची माहिती समोर आली आहे.
(Strict lockdown in the state if the number of patients exceeds 30 thousand; Proposal of the Chief Secretary.)
राज्यात सध्या निर्बंधात शिथिलता देण्यात आली आहे. राज्यातील शाळा, महाविद्यालय व मुंबईत लोकल सुरु करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे येत्या काळात कोरोना संसर्गाचा (Corona infection) धोका आणखी वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. मात्र, आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आत्तापासूनच प्लानिंग केले जात आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा (Third wave of corona) सामना करताना ऑक्सिजनची उपलब्धतता हा महत्वाचा प्रश्न असणार आहे. यामुळे ऑक्सिजनची (oxygen) उपलब्धता विचारात घेऊन कोरोना रुग्णांची संख्या 30 हजार पेक्षा जास्त झाल्यास राज्यात कडक लॉकडाऊन जाहीर केला जाण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
लोकल प्रवाशांमुळे गर्दी वाढणार असून त्यातच सणासुदीच्या दिवसात बाजारपेठा तसेच इतर ठिकाणी रहदारी वाढणार आहे. यामुळे कोरोनाचा फैलाव वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. राज्यातील व मुंबईमधील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आहे. मात्र, गाफील राहून चालणार नाही निर्बंध शिथील केल्यामुळे होणारी गर्दी विचारात घेता कोरोना रुग्ण शोध व रुग्ण संपर्कातील व्यक्तींचा कठोरपणे शोध घेणे व लसीकरणाचा (vacccination) वेग वाढवणे गरजेचे असल्याचे मत टास्क फोर्समधील सदस्यांनी व्यक्त केले आहे.
सोमवारी झालेल्या टास्क फोर्सच्या (Task force) बैठकीत संभाव्य तिसरी लाट, ऑक्सीजनची लागणारी गरज, लसीकरणाचा वेग वाढवणे, ट्रेसिंग, ट्रेकिंग वाढवणे, तसेच येणाऱ्या काळात आणखीही काही क्षेत्रांच्या बाबतीत सावधानता बाळगून कशा प्रकारे निर्बंधात शिथिलता आणायची यावर चर्चा झाली. बैठकीतील सूचनांच्या अनुषंगाने टास्क फोर्स नियमावली (Guidelines) तयार करीत आहे.