न्यायालयाची फटकार … महिलेशी छेडछाड व अश्लिल वर्तवणूक करणाऱ्या आरोपीला अजब शिक्षा.

मधुबनी दि.22 सप्टेंबर – बिहारच्या (Bihar) मधुबनी जिल्ह्यात झंझारपूर येथील स्थानिक न्यायालयाने महिलेशी छेडछाड व अश्लिल वर्तवणूक करणाऱ्या एका आरोपीला गावातील सर्व महिलांचे कपडे धुण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने सुनावलेली ही शिक्षा सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.
(Court slaps … Strange punishment for accused who molested a woman.)
याबाबत सविस्तर वृत्त असे की, बिहारमधील मधुबनी (Madhubani) जिल्ह्यात लौकहा पोलीस ठाण्यात (Police Station) लल्लन कुमार याच्याविरोधात 19 एप्रिल रोजी छेडछाड आणि महिलांशी गैरवर्तवणूक करण्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर त्याला पोलिसांनी (Police) अटक केली. लौकहा पोलीस ठाण्याचे संतोष कुमार मंडल यांनी सांगितले की, 17 एप्रिलला रात्री गावातील एका महिलेसोबत छेडछाड आणि तिच्याशी गैरवर्तवणूक करण्याचा प्रयत्न आरोपी ललन कुमारने केला होता. 18 एप्रिलला पीडित महिलेने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार (complaint) केली. त्यानंतर ही पुढील कारवाई करण्यात आली.
या प्रकरणाची सुनावणी सुरु असताना न्यायालयाने आरोपीला विचारले की, तो कुठला व्यवसाय करतो. त्यावर त्याने धोबीकाम करत असल्याचं सांगितले. तेव्हा न्यायालयाने महिलांचे कपडे धुण्याचे आदेश दिले. गावात जवळपास दोन हजार महिलांची लोकसंख्या आहे. म्हणजे आरोपीला पुढील 6 महिने 2000 महिलांचे कपडे मोफत धुवावे लागणार असून त्यानंतर त्याला इस्त्री करून त्यांना परत करावे लागतील.
तसेच आरोपी ललन योग्यप्रकारे न्यायालयाच्या आदेशाचं पालन करतोय की नाही हे पाहण्याची जबाबदारी गावातील सरपंच अथवा ग्रामसेवक यांच्याकडे राहील. आरोपी ललनला त्याने केलेल्या मोफत कामाबद्दल सरपंच अथवा ग्रामसेवकाकडून प्रमाणपत्र आणून ते न्यायालयात सादर करावं लागेल. न्यायालयाने (Court) अटी-शर्थींसह दिलेला जामीन अर्जाची प्रत सरपंच आणि गावातील प्रमुखांकडे पाठवण्यात आली आहे.
न्यायालयाने सुनावणी करताना म्हटलंय की, पुढील 6 महिने आरोपीने गावातील सर्व महिलांचे कपडे धुवावे जेणेकरून त्याच्या मनात महिलांप्रती आदर निर्माण होऊ शकेल. इतकचं नाही तर आरोपीने महिलांचे कपडे धुवून झाल्यानंतर ते इस्त्री (Ironing) करून घरोघरी जाऊन ते परत करावेत असंही न्यायालयाने सांगितले आहे. न्या. अविनाश कुमार यांनी या प्रकरणात सुनावणी करत 20 वर्षीय आरोपी लल्लन कुमारला फटकारत महिलांचा सन्मान करण्यास सांगितले आहे.