उन्हाळी सुट्टया … शाळांच्या सुट्याबाबत शासनाचा सुधारित आदेश जारी.

मुंबई दि.12 एप्रिल – गेल्या दोन तीन वर्षात बिघडलेल्या शैक्षणिक वर्षाची घडी बसवण्यासाठी यंदाच्या उन्हाळी सुट्याबाबत (Summer vacation) निर्णय घेण्यात आला आहे. शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी 2 मे पासून राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना उन्हाळी सुट्टी लागू होणार असून येणाऱ्या शैक्षणिक वर्षात सोमवार 13 जून रोजी शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
चालू सन 2022 ची उन्हाळी सुट्टी व आगामी शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये शाळा सुरू करण्याबाबत शासन स्तरावरून निर्णय घेण्यात आला. याबाबतचे परिपत्रक शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने जारी केले आहे. या परिपत्रकानुसार सोमवार 2 मे, 2022 पासून उन्हाळी सुट्टी लागू करण्यात येणार आहे. सदर सुट्टीचा कालावधी रविवार दि.12 जून 2022 पर्यंत ग्राह्य धरण्यात येऊन सन 2022-23 मध्ये पुढील शैक्षणिक वर्षात (Academic year) दुसरा सोमवार दि.13 जून 2022 रोजी शाळा सुरू करण्यात येतील. जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टी नंतर तेथील शाळा चौथा सोमवार दि.27 जून, 2022 रोजी सुरू होतील.
जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात शालेय शिक्षण विभागाकडून काही सुचना व निर्देश देण्यात आल्या आहेत. इयत्ता पहिली ते नववी व 11 वी चा निकाल दिनांक 30 एप्रिल 2022 रोजी अथवा त्यानंतर सुट्टीच्या कालावधीत लावता येईल. तसेच निकाल विद्यार्थी/ पालकापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी संबंधीत शाळेची राहणार आहे.
शाळांतून उन्हाळ्याची व दिवाळीची दीर्घ सुट्टी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव अथवा नाताळ यासारख्या सणांच्याप्रसंगी ती समायोजनाने संबंधित जिल्ह्याच्या प्राथमिक/ माध्यमिक शिक्षण अधिकारी (Education Officer) यांच्या परवानगीने घेता येईल. तसेच माध्यमिक शाळा संहितेनुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुट्या 76 दिवसापेक्षा जास्त होणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी असंही शिक्षण विभागाने (Education Department) सांगितले आहे. सदर परिपत्रकावर शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे सह सचिव इम्तियाज मुश्ताक काझी यांची स्वाक्षरी आहे.
( Summer vacation … Government issued revised order regarding school vacation. )