अरुण राठोडच्या अटकेमुळे सुटणार पुजा चव्हाण आत्महत्येचा गुंता…?

पुणे: दि.१८- पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात महत्त्वाचा दुवा असलेला अरुण राठोड (Arun Rathod) दहा दिवसांनी पोलीसांना सापडला आहे. पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत आज अरुण राठोडला ताब्यात घेतले. आता या प्रकरणात अरुण राठोडची थेट पोलीस आयुक्तालयात चौकशी होण्याची शक्यता आहे. यामुळे पूजा चव्हाण आत्महत्येचा गुंता सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
(Pooja Chavan Suicide Case)
वादंग उठलेल्या पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाच्या तपासाचा पोलीसांनी अहवाल तयार केला आहे. अरुण राठोडच्या (Arun Rathod) नावाने व्हायरल रेकॉर्डिंगचा अहवालात उल्लेख आहे. यवतमाळ प्रकरणातही अरुण राठोड (Arun Rathod) नामक व्यक्ती असल्यानं संशय बळावला. पोलीस अहवालात विजय चव्हाणही सोबत असल्याचा उल्लेख आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी वरिष्ठ पोलीस अधिकारी करणार आहेत. या प्रकरणात एकूण तीन पथकं चौकशी करत आहेत. या अगोदर पूजाच्या आई वडिलांचा जबाबही घेण्यात आला आहे. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात अद्यापही गुन्हा दाखल नाही, केवळ आकस्मिक मृत्यूचीच नोंद पोलीस ठाण्यात (Police Station) केलेली आहे.
दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात काल नवा ट्विस्ट आला होता. पूजा अरुण राठोड नावाच्या तरुणीचा यवतमाळच्या रुग्णालयात गर्भपात झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. त्यामुळे ही पूजा अरुण राठोड कोण? पूजा अरुण राठोड हिचा पूजा चव्हाणशी काय संबंध? पूजा अरुण राठोड हीच पूजा चव्हाण आहे का? कथित मंत्र्याने आपल्या जिल्ह्यातील रुग्णालयात हा गर्भपात घडवून आणलाय का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
काय आहे गर्भपाताच्या अहवालात?
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, यवतमाळचा हा रिपोर्ट आहे. या रिपोर्टवर इंग्रजीत ड्राफ्ट कॉपी असं लिहिलं असून त्या खाली शॉर्ट केस रेकॉर्ड असं लिहिलं आहे. रिपोर्टवर प्रिंट दिनांक १७ फेब्रुवारी २०२१ लिहिले आहे. वेळ दुपारी १.४७ वाजताची आहे. तर सेव्हड तारीख १२ फेब्रुवारी २०२१ लिहिली असून वेळ संध्याकाळ ७.२९. वाजताची आहे. ६ फेब्रुवारी २०२१ रोजी दुपारी ४ वाजून ३४ मिनिटांनी रुग्णालयात भरती केल्याचेही यात नमूद करण्यात आलेलं आहे. म्हणजे पूजा अरुण राठोड या तरुणीवर ६ फेब्रुवारी रोजी उपचार झाल्याचं स्पष्ट होत आहे. वॉर्ड नंबर ३ मध्ये या महिलेला अॅडमिट करण्यात आलं असून युनिट नंबर २ मध्ये ही तरुणी उपचार घेत असल्याचंही त्यावर नमूद करण्यात आलं आहे. डिस्क्रिप्शनमध्ये कोणत्याही गुंतागुंतीशिवाय या महिलेचा गर्भपात करण्यात आल्याचेही यात स्पष्टपणे लिहिलेले आहे.
(Pooja Chavan Suicide Case )