मोठी बातमी … राज्यातील नगरपरिषदांच्या सदस्यपदाच्या आरक्षण सोडती 13 जुनला.

मुंबई दि.9 जुन – राज्यातील 216 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या (Municipal Council ) सदस्यपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 13 जुन 2022 रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने ( State Election commission ) जाहीर केले आहे. यामुळे लवकरच नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीचे बिगुल वाजणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्यभरातील 216 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सदस्यपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 13 जुन 2022 रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने 15 ते 21 जुन 2022 या कालावधित हरकती व सूचना दाखल करता येतील, अशी घोषणा राज्य निवडणूक आयोगाने आज गुरुवारी (9 जुन) केली.
आरक्षणाची सोडत काढण्यात येणाऱ्या 216 मध्ये 208 नगरपरिषदा आणि 8 नगरपंचायती आहेत. त्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला आणि सर्वसाधारण महिलांच्या सदस्यपदांसाठी ही सोडत काढण्यात येईल. आरक्षण सोडतीसाठी संबंधित जिल्हाधिकारी 10 जुनला नोटीस प्रसिद्ध करतील.
13 जुन 2022 रोजी संबंधित ठिकाणी आरक्षण सोडत काढण्यात येईल. आरक्षण सोडतीच्या अनुषंगाने काही हरकती किंवा सूचना असल्यास त्या 15 ते 21 जुन 2022 या कालावधीत दाखल करता येतील. संबंधित विभागीय आयुक्त सदस्यपदांच्या आरक्षणास मान्यता देतील. आरक्षणाची अंतिम अधिसूचना 1 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल, असेही आयोगाकडून जाहीर करण्यात आले आहे.
( Big news … Reservation of Municipal Council members in the state will be released on 13th June. )