आश्चर्य… अन् सरणावर पाणी पाजून अग्नी देताना आजीबाई झाल्या जिवंत.

औरंगाबाद दि.3 अॉगस्ट – औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील अंधानेर (ता.कन्नड) येथे एक 80 वर्षीय महिला चितेवर जिवंत झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली. दुःखाच्या सागरात बुडालेल्या कुटुंबीयांना या घटनेमुळे सुखद धक्का बसला आहे. कुटुंबीयांनी तात्काळ सदरील वृध्द महिलेस सरणावरून खाली उतरत रुग्णालयात दाखल केले. तपासणी नंतर डॉक्टरांनी वृध्देच्या शरीराची हालचाल सुरु असून त्या ब्रेन डेड (Brain dead) असल्याचे जाहीर केले.
(Surprise … Grandmother came alive while pouring water on the bed.)
जिजाबाई गोरे (80) रा.अंधानेर ता.कन्नड असे सदर वृद्ध महिलेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कन्नड शहरातील माजी नगरसेवक विलास गोरे यांच्या आईचे सोमवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. याबाबत त्यांच्या निधनाची माहिती फोन वरून तसेच सोशल मिडियावरून (Social media) नातेवाईक, मित्र व गावकऱ्यांना देण्यात आली. त्यांचा अंत्यविधी येथील स्मशानभूमीत रात्री होणार असल्याचाही सर्वांना निरोप देण्यात आला.
यानंतर अंत्यविधीची तयारी करून रात्री 7 ते 8 च्या सुमारास वाजत गाजत अंत्ययात्रा काढण्यात आली. अंधानेर येथील स्मशानभूमीत रचलेल्या सरणावर सदर वृद्ध महिलेचा देह ठेवण्यात आला. तसेच गोवऱ्याही रचण्यात आल्या. शेवटी पाणी पाजून अग्नी देण्याचा विधी सुरु करण्यात आला. याच वेळी जिजाबाई यांच्या पापण्या हालल्याचे काहींच्या लक्षात आले. त्यांनी त्वरित अग्नी देणे थांबविले. त्यानंतर वृद्धेचा हात हलताना अनेकांना दिसला. यावेळी कुटुंबीयांसह नातेवाइकांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला.
त्यानंतर कुटुंबीयांसह नातेवाइकांनी त्यांना चितेवरून चक्क खाली उतरविले आणि त्वरित रात्री जवळपास साडेनऊच्या सुमारास कन्नड येथील डॉ.मनोज राठोड यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी तपासणी केली असता त्या धडधडीत जिवंत असून, त्यांचे हृदय सुरू असल्याचे दिसून आले. मात्र, त्या ब्रेन डेड (Brain dead) असून कोमात गेल्याचे (Gone into a coma) डॉक्टरांनी कुटुंबीयांनी सांगितले. यानंतर डॉक्टरांनी कुटुंबीयांनी वृद्धेला घरी घेऊन जाण्यास सल्ला दिला. या घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत गोरे कुटुंबीयांच्या घरी नातेवाइकांसह ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.