एपीएल केशरी रेशन कार्डधारक नागरिकांना राज्य शासनाकडून तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ
अंत्योदयची साखरही दुकानात उपलब्ध

मुंबई दि.२५(वि.प्र.) राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या एपीएल केशरी रेशन कार्डधारक नागरिकांना राज्य शासनाकडून तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ असे प्रति व्यक्ती पाच किलो अन्न धान्य रेशन दुकानांमधून देण्यात येत आहे. राज्यातील तीन कोटी आठ लाख एपीएल केशरीकार्ड धारक लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानांमधून १ मे ऐवजी आता २४ एप्रिलपासूनच १.५६ लक्ष मे टन धान्याचे वितरण सुरू झाले आहे. तर अंत्योदयची साखरही दुकानात उपलब्ध झाली असुन लाभार्थ्यांनी तात्काळ दुकानदाराशी संपर्क करुन रितसर पावती घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
शिधावाटप दुकानांमधून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या केशरी (एपीएल) कार्डधारक नागरिकांना अन्नधान्य देण्यात येत नव्हते. मात्र, सध्याची परिस्थिती पाहून लॉकडाऊनच्या परिस्थितीत राज्यातील नागरिकांना अन्नधान्याचा तुटवडा होऊ नये, यासाठी ५९ हजार ते १ लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांना १२ रुपये प्रति किलोने दोन किलो तांदूळ व ८ रुपये किलोने तीन किलो गहू प्रति व्यक्ति देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या धान्याचे वाटप यापूर्वी १ मे रोजी सुरू करण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र, आता अनेक ठिकाणी २४ एप्रिल पासून हे धान्य वाटप सुरु करण्यात आले आहे.
“धान्य वाटपातील गैरप्रकारांविरुद्ध कडक कारवाई”
गरीब व गरजू रेशनकार्ड धारकांना अन्नधान्याचे नियमित व व्यवस्थित वाटप न करणाऱ्या व धान्य वाटपात गैरप्रकार करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जात आहे. आजतागायत राज्यातील ३९ रेशन दुकानांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून ८७ रेशन दुकानांचे निलंबन करण्यात आले आहे. तर ४८ दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.