महाराष्ट्रातील धक्कादायक घटना… एकाच कुटूंबातील 9 जणांची आत्महत्या.

बीड24 ब्रेकींग सांगली दि.20 जुन – सांगलीच्या मिरज तालुक्यातील म्हैसाळ या गावी राहत असलेल्या डॉक्टर माणिक यल्लाप्पा वनमोरे यांच्या कुटुंबातील नऊ जणांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. घटनास्थळी मिरज ग्रामीण पोलिस व ग्रामस्थांनी गर्दी केली होती. या घटनेमुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्रात (Maharashtra) खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सदर कुटुंबाने कर्जबाजारीपणामुळे सामूहिक आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आत्महत्या केलेल्यामध्ये पोपट यल्लाप्पा वनमोरे (वय 52), संगीता पोपट वनमोरे (वय 28), अर्चना पोपट वनमोरे (वय 30), शुभम पोपट वनमोरे (वय 28),माणिक यल्लाप्पा वनमोरे (वय 49), रेखा माणिक वनमोरे (वय 45), आदित्य माणिक वनमोरे (वय 15), अनिता माणिक वनमोरे (वय 28) आणि आक्काताई वनमोरे (वय 72) अशा नऊ जणांनी विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली आहे.
घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की म्हैसाळ येथील नरवाड रोड जवळ असलेल्या अंबिका नगर चौक लगत डॉक्टर वनमोरे कुटुंब राहत होते. अंबिका नगर मध्ये या कुटुंबाचे अजून एक घर आहे. आज सकाळपासून दोन्ही घराचा दरवाजा उघडा नव्हता. आसपासच्या शेजाऱ्यांनी घराचा दरवाजा उघडून पाहिले असता. एकाच घरात सहा जणांनी विष घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. तर दुसऱ्या घरात तिघांचे मृतदेह आढळून आले.
एकाच कुटुंबातील नऊ लोकांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे समोर येताच परिसरात एकच खळबळ उडाली. येथील रहिवाशांनी घटनेची माहिती मिरज ग्रामीण पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी सदर घरासमोर लोकांनी मोठी गर्दी केली होती. या धक्कादायक घटनेमुळे अवघा महाराष्ट्र हादरुन गेला आहे.
( Shocking incident in Maharashtra … 9 members of the same family commit suicide. )