आता शेतकऱ्यांना ॲपमधून अॉनलाईन भरता येणार पिक पेरा…

किल्लेधारूर दि.२६ (वार्ताहर ) शेतकऱ्यांना रब्बी पिकाचा पिक पेरा भरण्यासाठी मोबाईलद्वारे (Mobile)  ई पिक पहाणी ॲप (App) वर रब्बी पिका चा पेरा भरण्याची सुविधा देण्यात आली असून याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन तहसील कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. या ॲपमुळे आता शेतकऱ्यांना तलाठ्या कडे जाण्याची गरज राहणार नाही.

तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी चालू वर्षीच्या रब्बी हंगामातील पीक पेरा भरण्यासाठी संबंधित तलाठी यांचेकडे न जाता स्वतः ई पीक पाहणी ॲपवरून आपापल्या शेतात पेरणी केलेल्या रब्बी पीकांचा पेरा भरावा. ऑनलाइन (Online) पध्दतीने पीक पेरा भरता यावा यासाठी महाराष्ट्र शासनाने बीड जिल्ह्यासाठी पथदर्शी स्वरूपात ई पीक पाहणी प्रकल्प राबवण्यास मान्यता दिली आहे. अत्यंत सोप्या पद्धतीने या ॲप चा वापर करून शेतकऱ्यांना स्वतः पीक पेरा भरता येणार आहे. यासाठी गावांत कोणाकडेही उपलब्ध असलेल्या अँड्रॉइड मोबाईल (Mobile) ची आवश्यकता असून एका मोबाईल वरून 20 शेतकऱ्यांना आपापला पीक पेरा अपडेट करता येणार आहे. ॲप (app) कसे वापरावे यासाठी आवश्यक माहितीचे मॅन्युअल व्हाट्सअपच्या (Whatsapp) माध्यमातून तलाठी व कृषी सहायक यांनी गावात उपलब्ध करून दिले असून दि.२५ डिसेंबर ते दि.२८ डिसेंबर या कालावधीत तलाठी व कृषी सहायक यांचेमार्फत शेतकऱ्यांना बांधावर प्रशिक्षण देण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक गावस्तरावर एक नोडल अधिकारी म्हणून तलाठी अथवा कृषी सहायक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी सदर प्रशिक्षणास उपस्थित राहून त्यात दिलेल्या सूचनेनुसार आपापल्या शेतात चालू रब्बी हंगामात पेरणी केलेल्या पिकांचा पेरा ऑनलाइन (Online) पद्धतीने भरायचा आहे. याप्रमाणे ॲप (app) वर काम करत असताना कोणतीही अडचण आल्यास गावस्तरावरील नोडल अधिकारी यांचेकडून तात्काळ फोनवरून मार्गदर्शन घ्यायचे आहे. तालुक्यातील रब्बी पिकांची पेरणी केलेल्या सर्व शेतकरी बांधवांनी सदर ॲप (App) च्या माध्यमातून लवकरात लवकर रब्बी पीक पेरा अद्ययावत करून सदरचा प्रकल्प तालुक्यात यशस्वी करावा असे आवाहन तहसीलदार व्हि. एस. शिडोळकर, नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!