लग्नाच्या दोनच दिवसानंतर तिने मागितली खंडणी; आष्टी पोलिसांनी सापळा रचून केला पर्दाफाश

आष्टी दि.14 मार्च- तरुणांसोबत बनावट विवाह करून चार आठ दिवस सोबत राहून पैसे उकळणाऱ्या टोळीचा आष्टी पोलिसांनी (Police) पर्दाफाश केला आहे. प्राथमिक चौकशीत सदरील महिलेने तब्बल आठ जणांशी विवाह करून खंडणी वसूल केल्याचे समोर आले आहे. यामागे मोठे रॅकेट असण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. काही दिवसांपुर्वी पुणे पोलिसांनी अशाच टोळीचा पर्दाफाश केला होता. सध्या महिला व तरुणींच्या टोळीकडून बनावट विवाह (Fake marriage) करुन लोकांची फसवणूक करण्याचा नवा ट्रेंड समोर येत आहे.

(Just two days after the wedding, she demanded a ransom; Ashti police set a trap and exposed it)

आष्टी (Ashti) तालुक्यातील शिराळ येथील तरुणासोबत दि.९ रोजी विवाह करुन एका महिलेने २ लाख रुपये दे अन्यथा मला फसवून आणून बलात्कार केल्याचा खोटा गुन्हा दाखल करेल अशी धमकी तरुणाला दिली. महिलेच्या मागणी व धमकीनंतर सदरील तरुणाने पोलिसात धाव घेतली. यानंतर पोलिसांनी सापळा रचून खंडणी वसूल करताना सदरील महिलेस रंगेनाथ पकडून टोळीचा पर्दाफाश केला आहे. प्राथमिक चौकशीत आरोपी महिलेने तब्बल आठ जणांशी विवाह करून खंडणी वसूल केल्याचे समोर आले आहे. यामागे मोठे रॅकेट असण्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, आष्टी (Ashti) तालुक्यातील शिराळ येथील एका युवकाने पोलीस ठाणे आष्टी येथे तक्रार दिली की, दोन ते तीन दिवसांपूर्वी त्याचे एका महिले सोबत लग्न झाले असून आता ती महिला पैशाची मागणी करीत आहे. पैसे न दिल्यास बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी सदरील महिलेने दिली असल्याचे तक्रारीत नमुद केले. या तक्रारी वरुन पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी सदर तक्रारीची शहानिशा करुन सापळा रचून कारवाई केली.

यावेळी एक महिला व पुरुष यांनी तक्रारदार युवक याचेकडून मागणी केल्याप्रमाणे रोख रक्कम ५० हजार रुपये शासकिय पंचासमक्ष स्विकारली. सदर आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी यापुर्वी सात ते आठ युवकांसोबत बनावट लग्न (Fake marriage) लावुन त्यांना खोट्या तक्रारीच्या धमक्या देवुन त्यांचे कडुन पैसे उकळले असल्याचे निष्पन्न झाले. तक्रारदार यांचे जबाबा वरुन पोलीस (Police) ठाणे आष्टी गु.र.न 69/2021 कलम 384, 388, 389, 420, 34 भा.द.वि. प्रमाणे गुन्हा दाखल करुन दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक आर. राजा, अपर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सलिम चाऊस, पो. उपनिरिक्षक प्रमोद काळे, सहाय्यक फौजदार अरुण कांबळे, पो.हे.कॉ. बन्सी जायभाये, संतोष क्षीरसागर, पो.शिपाई प्रदिप पिंपळे, सचिन कोळेकर, स्वाती मुंडे, शिवप्रकाश तवले, रियाज पठाण यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!