असेही मित्रप्रेम…. मित्राने मित्रासाठी काय केले पहा…

किल्लेधारूर दि.२१(वार्ताहर) अडचणीत असलेल्या मित्राला अमेरिकास्थित मित्राने मदत केल्यानंतर त्या मित्राच्या वाढदिवसाच्या निमित्ताने येथील कोविड सेंटरवर कर्मचाऱ्यांची अडचण जाणून त्यांच्या साठी कसलाही गाजावाजा न करता आवश्यक वस्तू देत आगळावेगळा जन्मदिवस दुसऱ्या मित्राने धारुरात साजरा केला.
शहरात सराफा व्यवसाय करणाऱ्या सामान्य कुटूंबातील नारायण सहाणे यांना अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या प्रदिप लांडगे या वर्गमित्राने लॉकडाऊन काळात आर्थिक मदत केली. कोरोना काळात मोलाची मदत करणाऱ्या अमेरिकास्थित आपल्या वर्गमित्राचा दि.१८ रोजी वाढदिवस होता. हा वाढदिवस शहाणे यांनी सहकुटूंब येथील कोविड सेंटरवर साहित्य पुरवून साजरा केला. कोविड सेंटरवर विचारपुस करुन तेथे समाजात रोज आढळून येणाऱ्या कोरोना बाधितांची सुश्रुषा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची अडचण जाणुन घेतली. यानंतर कोविड सेंटरवर आवश्यक असलेल्या सॕनिटायझर, हँडग्लोज व मेडिकल मास्क या वस्तू महिनाभर पुरतील येवढ्या स्वखर्चातून वैद्यकीय अधिक्षक डॉ. चेतन आदमाने यांच्या कडे पत्नी व मुलांच्या उपस्थित सुपूर्द केल्या. मित्रप्रेमातून एका मित्राने अमेरिकेतून मित्राची मदत केली तर दुसऱ्या मित्राने समाजाचे काही तरी देणे लागतो व आवश्यक तेथे मदत पोहोचावी या हेतूने आगळावेगळा वाढदिवस साजरा केल्याचे दिसुन आले. प्रदिप लांडगे व नारायण सहाने या वर्गमित्रांनी समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.