बीड जिल्ह्यातील पाच नगरपंचायतचे नगराध्यक्ष कोण असणार ? कुठे आहे चुरस ?

बीड दि.8 फेब्रुवारी – बीड (Beed) जिल्ह्यातील पाच नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले. केज, आष्टी (Ashti), पाटोदा येथे एकच अर्ज दाखल झाला असल्याने येथील नगराध्यक्ष बिनविरोध होणार आहेत. मात्र शिरुर कासार व वडवणी येथे भाजपा व राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल झाल्यामुळे उत्सूकता वाढली आहे.

(Who will be the mayor of five Nagar Panchayats in Beed district? Where will the curiosity be?)

वडवणी नगरपंचायत
वडवणी नगरपंचायत निवडणुकी अतिशय चुरशीची झाली असून यामध्ये भाजपाला 8 जागा मिळाल्या तर राष्ट्रवादी व शहर बचाव आघाडीला 9 जागा मिळाल्या. अतिशय अटितटीच्या निवडणूकीत राष्ट्रवादी व शहर बचाव आघाडीला अवघ्या एका जागेने बहुमत मिळाले आहे.

आज मंगळवार (दि.8) फेब्रुवारी रोजी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शहर बचाव आघाडीकडून जगताप वंदना शेषराव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर भाजपकडून मंगला राजाभाऊ मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती नगरपंचायत मुख्याधिकारी संभाजी मंदे यांनी दिली आहे. राष्ट्रवादी व शहर बचाव आघाडीकडे काठावरचे बहुमत असल्यामुळे जगताप यांची नगराध्यक्ष पदावर वर्णी लागणार आहे.

केज नगरपंचायत
केज नगराध्यक्षपदासाठी केवळ एकच उमेदवारी अर्ज झाल्याने नगराध्यक्षाची निवड अविरोध झाली. केज नगरपंचायत निवडणुकीत मतदारांनी त्रिशंकू कौल दिल्याने येथे जनविकास आघाडी 8, राष्ट्रवादी काँग्रेस 5, राष्ट्रीय काँग्रेस 3, अपक्ष 1 असे सदस्यांचे संख्याबळ असल्याने कोणालाही स्पष्ट बहुमत नाही. त्यामुळे जनविकास आघाडी व राष्ट्रीय काँग्रेस यांनी एकत्र येऊन केज नगरपंचायत मध्ये सत्ता स्थापन करण्याचा दावा केला.

आज नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी जनविकास आघाडीच्या सीता बनसोडे यांचा एकमेव अर्ज आला. त्या केज नगरपंचायतीच्या अविरोध नगराध्यक्ष ठरणार आहेत. परंतु याची औपचारिक घोषणा आणखी बाकी आहे.

आष्टी, पाटोदा व शिरुर कासार नगरपंचायत
आष्टी, पाटोदा व शिरुर कासार नगरपंचायतसाठी झालेल्या निवडणूकीत आ. सुरेश धस (MLA Suresh Dhas) यांनी निर्विवाद वर्चस्व स्थापन केले आहे. यामुळे आ.धस देतील तोच उमेदवार नगराध्यक्ष पदी विराजमान होणार हे सांगितले जात होते. आज नगराध्यक्ष पदासाठी आष्टी येथे रंगनाथ धोंडे यांच्या सुन पल्लवी स्वप्नील धोंडे तर पाटोदा नगराध्यक्ष पदासाठी जि.प.चे माजी अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला यांच्या भावजई सय्यद खतीजाबी अमर यांचे एकमेव अर्ज दाखल झाले.

शिरुर कासार नगराध्यक्ष पदासाठी आ.धस यांच्याकडून प्रतिभा रोहिदास गाडेकर यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) नगराध्यक्ष पदासाठी शेख शयाना नसीर यांचा अर्ज दाखल झाला. मात्र भाजपाकडे (BJP) बहुमत असल्यामुळे गाडेकर यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

नगराध्यक्षपदाची (mayor) निवड 14 फेब्रुवारी रोजी होणार आहे. जिल्ह्यातील पाच पैकी आष्टी, पाटोदा व केज (Kaij) येथे एकच अर्ज आल्यामुळे नगराध्यक्ष पदाची औपचारिक घोषणा बाकी आहे. मात्र शिरुर कासार व वडवणी (Wadwani) येथे एकापेक्षा जास्त अर्ज असल्याने उत्सूकता वाढली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!