केज शहरात पहिला बळी; केजचा उद्रेक धारुरची डोकेदुखी वाढवणार

केज दि.५-(प्रतिनिधी) कोविड-१९ या विषाणुचा प्रादुर्भाव वाढतच असून आज सकाळी ८ वाजता कोरोनावर उपचार घेत असलेल्या एक रुग्ण दगावला असल्याने केज शहरात दहशत निर्माण झाली आहे. कोरोनाने मृत्यु झालेला हा केज शहरातील पहिलाच रुग्ण आहे. केजमध्ये होत असलेला कोरोना उद्रेक धारुरकरांची डोकेदुखी वाढवणारा ठरणार आहे.
केज व धारुर शहरासाठी चालू आठवडा कोरोना रुग्णांची संख्या वाढवणारा ठरत आहे. केज तालुक्यात गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काल रात्री शहरात सर्वाधिक १७ रुग्ण आढळून आली आहेत. या पाठोपाठ आज सकाळी केज शहरातील उपचार घेत असलेला एक रुग्ण दगावल्यामुळे शहरात दहशत माजली आहे. सदरील रुग्ण हा केज शहरातील अजीजपुरा भागातील राहणारा असून स्वतः आरोग्य कर्मचारी होता. याच भागात रात्री आलेल्या अहवालात पाच रुग्ण तर परिसरात तीन नवीन रुग्ण आढळून आली आहेत. केज तालुक्यात होणारा कोरोना उद्रेक धारुर शहरासाठी डोकेदुखी ठरणार आहे. केज शहरात मोठ्या प्रमाणात धारुरकरांची ये जा असते. तर धारुरचे अनेक व्यापाऱ्यांची दुकाने केज शहरात आहेत. नुकताच केज येथे एका दुकानात कामासाठी असणारा धारुरचा कामगार पॉझिटीव्ह आढळून आला आहे. यामुळे दोन्ही शहरात कोरोना रुग्ण वाढण्याची शक्यता आहे.