फादर्स डे दिवशीच वडिलांसह आईला मारहाण; आईचा मृत्यू … बीड जिल्ह्यातील हृदयद्रावक घटना.

बीड दि.20 जून – एकीकडे फादर्स डे (Fathers Day) निमित्ताने संपूर्ण देशभरात वडिलांचे ऋण व्यक्त केले जात आहे. तर दुसरीकडे मात्र बीड जिल्ह्यात घाटशिळ पारगाव येथे मुलगा आपल्या आई-वडिलांना काठीने बेदम मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल माध्यमातून (social media) व्हायरल झाला आहे. यामध्ये गंभीर बाब म्हणजे या मारहाणीत आईचा मृत्यू झाला असून वडील अहमदनगर येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
(Beating mother with father on Father’s Day; Mother’s death … heartbreaking incident in Beed district.)
याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, बीड जिल्ह्यातील घाटशिळ पारगाव येथील बाबासाहेब खेडकर या विकृत व्यक्तीने आपल्या आई-वडिलांना शनिवारी सायंकाळी चारच्या दरम्यान काठीने बेदम मारहाण केली. विशेष म्हणजे मारहाण करत असतानाचा व्हिडिओ गावातीलच एका व्यक्तीने शूट केला.
सोशल मीडियावर (social media) व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर घाटशिळ पारगाव येथील बाबासाहेब खेडकर यांचा विकृतपणा चव्हाट्यावर आला आहे. या संदर्भाने अद्याप पर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही. बाबासाहेब खेडकर हा चक्क काठीने आपल्या जन्मदात्या आई-वडिलांना मारहाण करत आहे. असे कृत्य तो सतत अधून मधून करत असतो असे येथील काही ग्रामस्थांनी सांगितले.
मात्र या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे या मारहाणीत बाबासाहेब खेडकर याची आई शिवबाई खेडकर हिचा मृत्यू झाला आहे. तर वडील अहमदनगर येथील दवाखान्यात गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृतीही चिंताजनक असल्याचे कळते.
आज जागतिक फादर्स डे
आज जागतिक फादर्स डे (Fathers Day) च्या निमित्ताने जगभरात वडिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जात आहे. मात्र दुसरीकडे बीड (Beed) जिल्ह्यात घाटशिळ पारगाव येथे आई-वडिलांना काठीने मारहाण करतानाचा एका मुलाचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे. ही बाब खेदजनक आहे.
तात्काळ चौकशी करू- आर. राजा
याबाबत बीड चे पोलिस अधीक्षक आर. राजा यांना विचारले असता ते म्हणाले की, वायरल झालेल्या त्या व्हिडिओ ची तात्काळ चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल. हा प्रकार खेदजनकच असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.