तालुक्यातील २८४ ऊसतोड कुटूंबांना अन्नधान्याचे किट वाटप
समाजकल्याण सभापती कल्याण आबूज यांची उपस्थिती

किल्लेधारूर दि.१२(वार्ताहर) येथील पंचायत समिती सभागृहात जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून वाटप करण्यात येत असलेल्या प्रभावित ऊसतोड कामगारांना अन्नधान्याच्या किटचे वाटप आज दि.१२ रोजी समाजकल्याण सभापती कल्याण आबूज यांच्या हस्ते करण्यात आले.
कोविड-१९ च्या प्रभावामुळे अडकुन पडलेले ऊसतोड कामगार परतली आहेत. या उसतोड कामगारांना क्वारांटाईन करुन ठेवण्यात आलेले आहे. अशा उसतोड कामगारांसाठी बीड जिल्हा परिषदेने ६५ लाख रुपयांचा स्वनिधी वितरित केला आहे. या योजनेत धारुर तालुक्यातील २८४ कुटूंबांना लाभ मिळणार आहे. या उपलब्ध निधीतून तालुक्यातील लाभार्थ्यांसाठी ६५० रु. चे अन्नधान्याचे किट तयार करुन वाटप करण्यात आले. येथिल पंचायत समिती सभागृहात आज समाजकल्याण सभापती कल्याण आबुज यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात वाटपास सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रसिद्ध उद्योगपती माधव निर्मळ, पंचायत समिती सभापती चंद्रकला हनुमंत नागरगोजे, उपसभापती प्रकाश कोकाटे, पं.स. सदस्य बालासाहेब मोरे, हनूमंत नागरगोजे, गटविकास अधिकारी सोपान अकेले यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष विजय गायसमुद्रे, जिल्हा उपाध्यक्ष संजय देशमुख, पंचायत समितीचे कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.