मोठी बातमी…. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा राजीनामा.

मुंबई दि.23 मार्च – महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. रुपाली चाकणकर या राष्ट्रवादीच्या आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांची नुकतीच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
कोण आहेत रुपाली चाकणकर…
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील आक्रमक कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख आहे. चाकणकर यांनी पुणे महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा व प्रदेश उपाध्यक्षा म्हणून काम पाहिले आहे. यानंतर गेल्या अडीच ते तीन वर्षांपासुन त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) महिला प्रदेशाध्यक्षा म्हणून काम करत आहेत.
राज्यात 2019 च्या विधासभा निवडणुकीच्या वेळी महिला राष्ट्रवादीच्या तत्कालीन प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर रुपाली चाकणकर यांची प्रदेशाध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली. या विधानसभा निवडणूकीत चाकणकर यांनी राज्यभर दौरा करत प्रचार कार्यात आपल्या कार्याची चुणूक दाखवून दिली. गेल्या दोन वर्षात चित्रा वाघ विरुद्ध चाकणकर यांच्यातील राजकीय वाद राज्यभर रंगल्याचे दिसून आले.
महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर चाकणकर यांनी पक्षाच्या अनेक कार्यक्रमासह केंद्र शासनाच्या विरोधात अनेक आंदोलनं केली. त्यांना नुकतीच राज्य महिला आयोगाच्या (State Women’s Commission) अध्यक्षपदाची संधी मिळाली. सदर पद अर्धन्यायिक स्वरूपाचे आहे. यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (Nationalist Congress Party) महिला विंगचे पद सोडले आहे. आता त्यांच्या जागी कोणाला संधी मिळणार, याकडे लक्ष राहणार आहे.
( Big news…. resignation of NCP’s women state president Rupali Chakankar. )