बीड जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरुच; वडवणीत कर्जबाजारी शेतकऱ्याचे विष प्राशन.

बीड दि.19 मे – बीड जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरुच असून वडवणी तालुक्यातील देवडी येथे शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून विषारी औषध घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. आसाराम दत्तू सांगळे (वय 44) असे या मयत शेतकऱ्याचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेमुळे देवडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, वडवणी तालुक्यातील देवडी येथील आसाराम दत्तू सांगळे (वय 44) हा शेतकरी मागील काही दिवसांपासून कर्जबाजारी होता. दरम्यान, चार पाच दिवसांपूर्वी या शेतकऱ्याच्या मुलीचे लग्न झाले. मुलीच्या लग्नात झालेला खर्च आणि पुर्वीचे कर्ज कसे फेडावे या चिंतेत तो होता. मागील तीन चार दिवसापूर्वी पासून मी कर्ज कसे फेडू आणि संसाराचा गाडा कसा चालवू, माझे कसे होणार असे सारखे म्हणत होता.
या कर्जामुळे आलेल्या नैराश्यातून मंगळवार (दि.17) रोजी सकाळी आठ वाजता त्यांनी शेतातील राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले. विषारी औषध घेतले ते माहीत होताच त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ बीड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचार सुरू असतानाच आज गुरुवार (दि. 19) रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. या दुर्दैवी घटनेने देवडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मयत शेतकऱ्याच्या पश्चात आई-वडील, चार भाऊ, भावजयी, पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.
( Farmer suicide season continues in Beed district; Poisoning of indebted farmers in Wadwani. )