धारुर शहरात अनिश्चित काळासाठी कर्फ्यू

किल्लेधारूर दि.२९(वार्ताहर) येथील आढळून आलेला कोरोना बाधित रुग्ण शहरात अनेकांच्या संपर्कात आलेला असल्याने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी तातडीचे आदेश काढत धारुर शहरात संचारबंदी लागू करत शहर अनिश्चित काळासाठी बंद केले आहे.
कोरोना बाधित आढळल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे. रात्री उशिरापर्यंत आरोग्य विभागाकडून बाधिताच्या संपर्कातील इतरांचा शोध घेण्यात येत होता. बाधित रुग्णाच्या संपर्कात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अनेकांचा संबंध आल्याचे दिसुन आले. यामुळे शहरात इतर भागात कोरोना विषाणूचा प्रसार होवू नये म्हणून फौजदारी प्रक्रिया दंडसंहिता १९७३ च्या कलम १४४ प्रमाणे पुर्ण धारुर शहर कन्टेनमेंट झोन म्हणून जाहिर करण्यात आले. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या आदेशानुसार पुढील अनिश्चित काळासाठी शहर पुर्णवेळ बंद करुन संचारबंदी जाहिर करण्यात आली आहे.