अंबाजोगाईजवळ भीषण अपघात; आठ जणांचा जागीच मृत्यू .

अंबाजोगाई दि.23 एप्रिल – अंबाजोगाई – लातूर (Ambajogai Latur) रोडवर बर्दापूर जवळ नंदगोपाल डेअरी समोर आज (दि.23) सकाळी 8.30 वा. लातूरहून अंबाजोगाईकडे जाणाऱ्या क्रूझर व ट्रकची समोरासमोर धडक झाली. यात क्रूझरमधील आठ जण जागीच ठार झाले असून मयताचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की लातूर येथील आर्वी गावातून अंबाजोगाई तालुक्यातील राडी येथे कार्यक्रमासाठी जात असलेल्या गंगणे कुटूंबियांच्या क्रुझर गाडीचा (क्र. एम.एच.24 व्ही 8061) समोरून येणाऱ्या ट्रक (क्र.आर.जे. 11 जी.ए.9210) यांच्यात समोरासमोर धडक होवून भीषण अपघात सायगांव ता. अंबाजोगाई जवळ आज सकाळी झाला. अपघात ऐवढा भीषण होता की रस्त्यावर अक्षरशः रक्तमांसाचा सडा पडला.
या अपघातात क्रुझर गाडीतील पाच महिला एक बालक व दोन पुरुष जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातातील जखमीना अंबाजोगाईच्या स्वाराती (SRTR) रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. अपघात (Accident) होण्याचे कारण वाहन वेगात चालवून ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे.
घटनास्थळी पोलिस (Police) व स्थानिकांकडून मदतकार्य सुरु आहे. मृत व जखमीची नावे अद्याप समोर आलेली नाहीत. सायगावनजीकचा नंदगोपाल डेअरी जवळचा हा रस्ता अपघाताचा सापळा बनत चालला आहे. गेल्या काही महिन्यापुर्वी एका बस व ट्रकचा भीषण अपघात याच ठिकाणी झाला होता. अरुंद रस्ता हा अपघाताचे मुख्य कारण असल्याचे सांगितले जात आहे.
( A tragic accident near Ambajogai; Six died on the spot. )