कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन बहिणींचा तलावात बुडून मृत्यू.

आष्टी दि.14 अॉगस्ट – परतूर तालुक्यातील सुरूमगाव येथे कपडे धुण्यासाठी आईसोबत गेलेल्या दोन मुलींचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज शनिवार दि.14 सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली. लक्ष्मी थोरात (वय 11) व श्रावणी थोरात (9) अशी मृतांची नावे आहेत. या प्रकरणी आष्टी पोलिसांत (Police) आकस्मातची नोंद करण्यात आली.
(Two sisters drowned in a pool while washing clothes.)
सुरुमगाव गावाजवळील गट नंबर 96 मधील पाझर तलावात शनिवारी सकाळी कपडे धुण्यासाठी रेणुका राजू थोरात या गेल्या होत्या. त्यांच्यासोबत लक्ष्मी, श्रावणी व मुलगा परसराम ही तीन मुले होती. तलावात आंघोळ करीत असताना लक्ष्मी व श्रावणी या पाण्यात बुडाल्या. ही बाब लक्षात येताच, रेणुका थोरात यांनी तलावात उडी घेऊन मुलींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.
मात्र, पाणी खोल असल्याने त्या दोघींना वाचविण्यात अपयश आले. रेणुका थोरात यांनी आरडाओरड केल्याने गावातील शामराव लहाने यांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतू तोपर्यंत दोघीही पाण्यात बुडाल्या होत्या. ग्रामस्थांनी दोन्ही मुलींचे मृतदेह बाहेर काढून आष्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.
या घटनेमुळे सुरुमगाव गावावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणी आष्टी जि.जालना पोलीस ठाण्यात (Police station) आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास सहायक पोलीस (API) निरीक्षक शिवाजी नागवे करीत आहेत.