धक्कादायक … ऑक्सिजन गळती दुर्घटनेत 22 रुग्णांचा मृत्यू; मृतांची संख्या वाढण्याची शक्यता.

धक्कादायक … ऑक्सिजन गळती दुर्घटनेत 22 पेक्षा जास्त रुग्ण दगावल्याची शक्यता.
नाशिक दि.21 एप्रिल – नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात (Zakir Hussain Hospital) ऑक्सिजनची गळती (Nashik Oxygen Tank Leak) झाल्याची धक्कादायक दुर्घटना घडली असून या दुर्घटनेत 22 पेक्षा जास्त रुग्ण दगावल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान सद्यस्थितीत अग्निशमन दलाकडून गळती थांबवण्याचे काम सुरु आहे. जिल्हाधिकारी सुरज मांडरे यांनी 22 जण दगावल्याची माहिती दिली.
(Shocking … More than 22 patients are likely to be killed in an oxygen leak accident.)
नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात (Zakir Hussain Hospital) दुपारी 12.30 च्या सुमारास ऑक्सिजनची गळती झाल्याचा प्रकार घडला. यानंतर ही गळती थांबवण्यासाठी प्रशासनाची एकच गर्दी पाहायला मिळाली. या रुग्णालयात 150 लोक व्हेंटिलेटरवर होते. त्यातील 22 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर 30 जण मृत्यूच्या दाढेत असल्याचे बोललं जात आहे.
गळती रोखण्यासाठी प्रयत्न
नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्यानंतर या रुग्णालयात अग्निशमन दल दाखल झालं आहे. या ठिकाणी ऑक्सिजन टाकीतील गळती रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. या संपूर्ण घटनेमुळे रुग्णालयात ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे. रुग्णालयात रुग्ण व नातलगांचा एकच विलाप पहायला मिळत आहे. 150 पैकी 53 रुग्ण व्हेंटीलेटरवर असल्याची माहिती कळते.
दरम्यान, ही घटना नेमकी कशी घडली, हा ऑक्सिजन टँक लीक (Nashik Oxygen Tank Leak) कसा झाला, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र या हलगर्जीपणामुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त घटनास्थळी दाखल झाले आहेत.
30 ते 35 जण दगावल्याचा प्रत्यक्षदर्शीचा दावा
या घटनेत प्रत्यक्षदर्शींनी मात्र या दुर्घटनेत दगावलेल्या रुग्णांची संख्या जास्तीची असण्याची भिती व्यक्त केली. मी स्वत: या रुग्णालयात आत जाऊन सर्व बेड चेक केले. यात 161 रुग्ण हे गंभीर आहेत. तर 30 ते 35 जण दगावल्याची माहिती मिळत आहे. गेल्या दीड तासापासून ते ऑक्सिजनसाठी तडफडत होते. पण त्यांना ऑक्सिजन न मिळाल्याने ते मृत्यूमुखी पडले आहेत, अशी माहिती शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिली. ज्या एजन्सी ऑक्सिजन प्लांट बसवला असेल, त्यांनी या ठिकाणी टेक्निकल टीम ठेवणं गरजेचे होतं. ऑक्सिजन प्लांट हे डॉक्टर बघत नाहीत. ते टेक्निकल काम असतं. मात्र त्यांनी टेक्निकल टीम या ठिकाणी का ठेवली नाही? असा सवालही सुधाकर बडगुजर यांनी केला आहे.