खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीचे पथक दाखल ; अटक होण्याची शक्यता .

मुंबई दि.31 जुलै – शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीचे पथक दाखल झाले आहे. गोरेगाव पत्राचाळ प्रकरणी त्यांची चौकशी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. ईडीचे दहा अधिकारी आज सकाळी राऊत यांच्या घरी पोहोचले. त्यांच्यासोबत सीआरपीएफचे (CRPF) सुरक्षा रक्षक जवान आहेत. या सुरक्षा रक्षकांनी राऊत यांच्या घराबाहेर पहारा सुरू ठेवला असून कुणालाही आत जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
ईडीने शिवसेना (Shiv Sena) नेते खासदार राऊत यांना दोन वेळा चौकशीसाठी नोटीस बजावली होती. मात्र, संसदेचे अधिवेशन सुरु असल्याचे सांगून खा.राऊत ईडीच्या चौकशीला सामोरे गेले नव्हते. तसेच त्यांनी ईडीकडून चौकशीसाठी मुदतवाढ मागवून घेतली होती. त्यानंतर आज अचानक ईडीचे पथक थेट राऊत यांच्या घरी पोहोचल्याने राऊत यांच्या अडचणीत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, राऊत यांच्या भांडूप येथील घरी ईडीची चौकशी सुरु असून चौकशीनंतर त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.
मागच्या अनेक दिवसांपासून संजय राऊत यांना ईडीकडून समन्स बजावण्यात येत होतं. संजय राऊत (MP Sanjay Raut) सध्या त्यांच्या कुटुंबियांसोबत घरी आहेत. अनेक प्रकरणांमध्ये त्यांची आज चौकशी होण्याची शक्यता आहे. ईडीने दोनदा संजय राऊत यांना ईडीचं समन्स बजावण्यात आलं होतं. त्यावेळी मी कोणाला घाबरत नाही असं त्यांनी वारंवार सांगितलं होतं. केंद्राच्या सांगण्यावरून आमच्यावर टीका केली जात असल्याचं देखील त्यांनी म्हटलं होतं.
संजय राऊत यांचे ट्विट
दरम्यान, राऊत यांच्या घरासमोर शिवसैनिकांनी गर्दी केली आहे. शिवसैनिकांकडून घोषणाबाजी करत ठिय्या दिला आहे. राऊत यांनी ट्वीट करत कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीचा संबंध नसल्याचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या शपथेवर सांगितले. मी मरेन पण शिवसेना सोडणार नाही, बाळासाहेबांनी आम्हांला लढायला शिकवलं मी शिवसेनेसाठी लढत राहील असं ट्वीट केलं आहे.
( ED team entered MP Sanjay Raut’s house; Possibility of arrest. )