बर्ड फ्लू नियंत्रणासाठी अशी घ्या काळजी…. बीड जिल्हा प्रशासनाचे आवाहन.

बीड दि.११:- बर्ड फ्लू (H5N8) रोगाचा प्रादुर्भाव हिमाचल प्रदेश, केरळ, मध्यप्रदेश, राज्यस्थान या राज्यांतील स्थलांतरित पक्षांमध्ये आढळून आला आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये देखील बीडसह काही ठिकाणी तपासणीचे निष्कर्ष पॉझिटिव्ह (Positive) आले आहेत, त्याअनुषंगाने बीड (Beed) जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी राहुल रेखावार (Rahul Rekhawar) यांनी सतर्कतेचे आवाहन केले आहे.
बीड (Beed) जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात मुगगाव येथे दि. ७ जानेवारी रोजी ११ कावळे मृत स्थितीत आढळून आले. त्या मृत कावळयांचे शव रोग निदानासाठी रोग अन्वेषण विभाग, पुणे मार्फत (NISHAD) भोपाळ येथे नमुने पाठविण्यात आले होते. सदरील नमुने बर्ड फ्लू (H5N8) पॉझिटिव्ह (Positive) आले आहेत. त्या अनुषंगाने सदर क्षेत्रास संसर्गग्रस्त क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात येत असून, तेथे निर्धारित प्रतिबंधक निर्देश लागू करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.
यासंदर्भात सर्व पोल्ट्री धारक व सर्व सामान्य जनतेस प्रशासनाच्या वतीने पुढील आवाहन करण्यात आले. जिल्ह्यातील कोणत्याही गावांमध्ये कावळे, पोपट, बगळे, किंवा स्थलांतरीत होणाऱ्या पक्षांमध्ये गर्नुक झाल्याचे आढळून आल्यास किंवा व्यवसायीक पोल्ट्री फार्म मधील पक्षांमध्ये नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात मरुक झाल्याचे निदर्शनास आल्यास, तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यास माहिती द्यावी.
मृत पक्षास हात लावू नये, शव विच्छेदन करु नये किंवा परस्पर विल्हेवाट लावू नये.
प्राण्यांमधील संक्रामक व संसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ च्या कलम ४ (१) अन्वये प्रत्येक पशुपालक अथवा इतर कोणतीही व्यक्ती, शासनेत्तर संस्था, सार्वजनिक संस्था किंवा ग्रामपंचायत, पशपालक ज्यांना नमुद कायद्याशी संलग्न असणाऱ्या अनुसूचितील रोगाचा संसर्ग झाल्याची शक्यता वाटल्यास त्या वस्तुस्थितीची माहिती नजीकच्या ग्रामविकास अधिकारी किंवा ग्रामपंचायत प्रभारी यांना देणे व ही माहिती नजीकच्या उपलब्ध पशुवैद्यकीय दवाखाण्यास लेखी स्वरुपात कळविणे बंधनकारक असल्याची नोंद घ्यावी.
बर्ड फ्लू (Bird flu) चा झालेला उद्रेक आहे त्याच ठिकाणी नियंत्रित करण्याकरिता जिल्ह्यातील प्रत्येकाने दक्षता घेणे आवश्यक आहे.
परंतू अंडी व कुक्कुट मांस किमान ७०°से. तापमानावर ३० मिनिटे शिजवून खाल्ल्यास विषाणू निष्क्रीय होत असल्याने अंडी व पोल्ट्री मांस खाणे हे पूर्णत: सुरक्षित आहे. बर्ड फ्लू (Bird flu) रोगाबद्दल शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरविण्यात येवू नयेत, अशी सर्व जनतेस विनंती करण्यात आली आहे.