पुतण्याकडून चुलत्याचा खून……बीड जिल्ह्यातील घटना

अंबाजोगाईः दि.५ (प्रतिनिधी)- काही दिवसांपुर्वी बीडमध्ये पुतण्याने चुलत्याचा उमेदवारी अर्ज फाडल्याच्या बातम्या झळकल्या होत्या. आता मात्र खर्चासाठी पैसे देण्यास नकार देणाऱ्या चुलत्याचा रागाच्या भरात पुतण्याने निर्दयपणे खून (Murder) केल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे सोमवार दि.४ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली आहे. पोलिसांनी (Police) मारेकरी पुतण्यास अटक केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनूसार, आरोपी अर्जुन दत्तात्रय धोंगडे याने जनार्धन मुंजा धोंगडे यांस रविवारी खर्चासाठी पैसे मागितले होते. परंतु जनार्धन धोंगडे यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने, रागाच्या भरात शिवीगाळ करुन अर्जुन निघून गेला. दरम्यान दुसऱ्या दिवशी सोमवारी (दि.०४) जनार्दन हे गंगाखेडहून सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास गावात परतले. ते घरासमोर येताच अर्जूनने आदल्या दिवशी पैसे न दिल्याच्या रागातून त्यांच्या डोक्यात, हातावर आणि शरीरावर इतरत्र वार केले. यावेळी जनार्दन यांची मुलगी वैशाली वडिलांना वाचविण्यासाठी आरडाओरडा करू लागली. अर्जुन तिच्यासह इतर लोकांवर धावून जावू लागला. अखेर जमाव वाढल्याने अर्जुनने तिथून पळ काढला. वैशालीने इतर लोकांच्या मदतीने रक्तबंबाळ झालेल्या वडिलांना रिक्षातून अंबाजोगाईच्या (Ambajogai) स्वा.रा.ती. ग्रामीण रुग्णालयात आणले. उपचार सुरु असताना जनार्दन यांचा मृत्यू झाला. मुलगी वैशाली बापूराव वाघमारे हिने दिलेल्या फिर्यादीनूसार अर्जून दत्तात्रय धोंगडे याच्यावर अंबाजोगाई (Ambajogai) ग्रामीण पोलिस (Police) ठाण्यात खुनाचा (Murder) गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांनी आरोपीस अटक केल्याची माहिती मिळाली.