फूंकर मारलेल्या लिंबूमुळे वीस कोरोनाग्रस्त !

औसाः सुकून बघणाऱ्या एका आराध्याने लिंबू व कुंकूवावर फुंकर मारुन दिलेल्या देवीचा प्रसाद खाल्ल्याने लातूर जिल्ह्यातील सारोळा ता.औसा येथील तीन कुटूंबातील वीस जनांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आराध्यावर साथरोग प्रतिबंधक कायद्यासह जादुटोणा विरोधी कायद्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि.६ सोमवार रोजी लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी आढावा बैठकीत जिल्ह्यातील सारोळा या अतिशय लहान गावात २३ रुग्ण आढळून आल्यामुळे माहिती घेतली. यावेळी औशाच्या तहसीलदार शोभा पुजारी यांनी ही माहिती दिली. पुजारी यांच्या माहितीमुळे ना.देशमुखसह सर्व सभागृह आवाक झाले. लातूरच्या खाजगी रुग्णालयात उपचार घेतलेली व्यक्ती २२ जून रोजी सारोळ्यात आली. त्याला कोरोनाची लक्षणे दिसल्यानंतर लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दि.२५ जूनला त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला. यानंतर त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेत असताना सदरील धक्कादायक प्रकार समोर आला. दि.२३ रोजी सदरील आराध्याने दोन ठिकाणी परडी भरण्याचा कार्यक्रम केला. या कार्यक्रमातून संपर्कात आलेल्या तीन कुटूंबातील २० जनांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. यांच्या संपर्काचा शोध घेत असताना डॉ.संतोष हिंडोळे यांनी केलेल्या चौकशीत सुकून बघण्याचा प्रकार समोर आला. आराधीने लिंबू व कुंकू यावर आपल्या तोंडावाटे फुंकर घालून भाविकांना खायला दिला. सदरील प्रसाद सेवन केल्यामुळे त्या तीन कुटूंबातील २० जनांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेमुळे खळबळ उडाली असून कोरोना संकट काळात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अंधश्रध्दा बोकाळल्याचे दिसत आहे. या प्रकरणी सदरील आराध्यावर पोलिस पाटलांनी दिलेल्या फिर्यादी वरुन साथरोग प्रतिबंधक कायद्यासह जादुटोणा विरोधी कायद्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.