धक्कादायक….आपत्तीत तारणाऱ्यावर सणासुदीत आपत्ती; पूर्वसुचना न देता कोविड सेंटरचे कर्मचारी कार्यमुक्त;

किल्लेधारूर दि.४(वार्ताहर) येथील कोविड (Covid-19) सेंटरवरील सात स्टाफ नर्स यांना कसलीही पूर्वसुचना न देता काल दि.३ रोजी थेट कार्यमुक्त होण्याचे आदेश आरोग्य प्रशासनाने (Health department) दिले आहेत. प्रशासनाला आपत्ती काळात तारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर ऐन सणासुदीत प्रशासनाने आपत्तीत टाकल्यामुळे अतिशय कठिण काळात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जनसामान्यात सहानुभूती निर्माण होत आहे.
जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ठ कार्य करणाऱ्या येथील कोविड (Covid-19) सेंटरवरील काम कर्मचाऱ्यांवर संक्रांत आली आहे. एकीकडे प्रशासन जनतेस दुसऱ्या संभाव्य लाटेबाबत नियम पाळणे व सतर्क राहण्याचे आवाहन करत आहे तर दुसरीकडे आपत्ती काळात कंत्राटी पध्दतीवर भरती केलेल्या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करत असल्याचे दिसत आहे. येथील कोविड (Covid-19) केअर सेंटरवर कोरोनाच्या (corona) आपत्ती काळात ३३ कर्मचारी भरण्यात आली होती. यात ५ वैद्यकीय अधिकारी, १७ स्टाफ नर्स, मॕनेजर, स्टोर किपर, फार्मासिस्ट, लॕब टेक्नेशियन प्रत्येकी एक, २ डाटा इंट्री अॉपरेटर तर ५ वार्डबॉय यांचा समावेश आहे. या काळात भितीपुर्ण परिस्थिती असताना अनेकांनी जीव धोक्यात घालुन काम करण्याची तयारी दाखवत सेवा दिली.
गेल्या काही दिवसांपासून कोरोना (Corona) पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या कमी झाली आहे. याकारणाने तालुका आरोग्य प्रशासनाने (Health department) वाढीव कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्याचा निर्णय घेतला. येथील कोविड सेंटरवर एकुण १५० बेडची व्यवस्था असुन आजही ३५ रुग्ण उपचार घेत आहेत. एकीकडे संभाव्य धोका तर दुसरीकडे कर्मचारी कमी करण्याचा निर्णयामुळे संभ्रम निर्माण होत आहे. अनेक ठिकाणी आपत्ती काळात महत्वाची सेवा देणाऱ्या या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याची मागणी होत असताना आरोग्य प्रशासनाचा कर्मचाऱ्यांना कसलीही पूर्वसुचना न देता कार्यमुक्त करण्याचा प्रकार धक्कादायक आहे.