मुस्लिमांची अवस्था ‘बँड बाजा पार्टी’सारखी … खासदार ओवेसी यांचा राजकीय पक्षांवर निशाणा.

कानपूर (वृत्तसंस्था) दि.27 सप्टेंबर – एमआयएमचे (AIMIM) अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी (MP Asaduddin Owaisi) यांनी उत्तर प्रदेशातील कानपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात मुस्लिमांचा वापर करणाऱ्या राजकीय पक्षांवर निशाणा साधला. मुस्लिमांची अवस्था लग्नाच्या वरातीतल्या ‘बँड बाजा पार्टी’सारखी झाली असल्याचं ओवेसी यांनी यावेळी म्हटलं आहे.
(The situation of Muslims is like ‘Band Baja Party’ … MP Owaisi targets political parties.)
आगामी उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) विधानसभा निवडणुकीसाठी ओवेसी यांनी अयोध्येतून प्रचार मोहिमेला सुरुवात केली असून अनेक सभा घेतल्या आहेत. उत्तर प्रदेशातील कानपूर (Kanpur) येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना ओवेसी यांनी खंत व्यक्त करताना प्रत्येक जातीकडे त्यांचा नेता आहे. मात्र मुस्लिमांकडे नाही असं म्हटलं.
“मुस्लिमांची अवस्था लग्नाच्या वरातीमधील बँड बाजा पार्टीसारखी झाली आहे, जिथे मुस्लिमांना आधी संगीत वाजवायला सांगितलं जातं आणि लग्नाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर बाहेर उभं केलं जातं.” असं ओवेसी यांनी यावेळी म्हटलं. “आता मुस्लीम वाद्य वाजवणार नाहीत. प्रत्येक जातीकडेही त्यांचा नेता आहे, मात्र मुस्लिमांकडे त्यांचा नेता नाही. उत्तर प्रदेशात 19 टक्के मुस्लीम लोकसंख्या आहे, मात्र एकही नेता नाही” असंही पुढे ते म्हणाले.
ओवेसी यांनी यावेळी सीएएविरोधात करण्यात आलेल्या आंदोलनांचा उल्लेख करताना यावेळी सीएए आणि एनआरसीविरोधात (CAA and NRC) आंदोलन करताना मृत्यू झालेले शहीद असल्याचं म्हटलं. “ज्यांनी त्या लोकांना मारले ते सर्व नष्ट होवोत,” असं ओवेसी यांनी यावेळी म्हटलं.