भरधाव टॅम्पोने मोटारसायकलस्वाराला चिरडले….. ऊसतोड मजूराचा मृत्यू

माजलगाव दि.११(प्रतिनिधी)- भरधाव वेगात असणाऱ्या आयशर टॅम्पोने मोटार सायकलला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात पाथरी तालुक्यातील सिमुरगव्हाण येथील ऊसतोड मजूर राजकुमार नारायण उगले यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना ९ फेब्रुवारी मंगळवार रोजी ५ वाजण्याच्या सुमारास घडली होती.
पाथरी येथील राजकुमार नारायण उगले (वय ५० वर्षे ) हे रामगाव (छोटेवाडी) येथील ऊस उत्पादक शेतकरी सरपंच अंगदराव कटके यांच्या शेतात परभणी जिल्ह्यातील सिंगणापुर येथील श्री.लक्ष्मी नृसिंह साखर कारखान्याची ऊसतोड सुरू आहे. यामध्ये उगले हे ऊसतोडणीचे काम करतात. बाजारासाठी ऊसतोड टोळीवरून माजलगावला मोटार सायकल हिरो होंडा गाडीवरून राष्ट्रीय महामार्ग-६१ वरुन माजलगावला जात होते. या दरम्यान कल्याणनगर ते पवारवाडीच्या मध्ये भरगाव वेगात आलेल्या (एम.एच.०६ बी.जी.०१८२) आयशर टॅम्पोने मोटारसायकलला जोराची धडक दिली. या धडकेत राजकुमार नारायण उगले यांना उपचारासाठी बीड येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डोक्याला मार लागल्याने त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.